अरुण मेहेत्रे, मकरंद घोडगे झी मीडिया पुणे : छडी लागे छम छम... विद्या येई घम घम... विद्यार्थ्याला विद्येत निपूण होण्यासाठी शिक्षकांची एखादी छडी हातावर पडणं साहजिक आहे. मात्र, अहमदनगरच्या शिक्षकाने गणित चुकल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला याच छडीने अमानूष शिक्षा केलीय. पाहुया नेमकं काय झालं ते...
रोहन दत्तात्रय जंजिरे... आठ वर्षांचा हा मुलगा पिंपळवाडी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत दुसरी इयत्तेत आहे. शाळेत वर्ग सुरु असताना रोहनचं गणित चुकलं, त्याचा राग चंद्रकात सोपान शिंदे या शिक्षकाला आला. 'तुला काहीच कसं येत नाही,' असे म्हणून त्यांनी रागाने त्यांच्या हातात असलेली लाकडी छडी रोहनच्या तोंडात घातली. अचानक लाकडी छडी तोंडात घुसवल्याने रोहन जोरात ओरडला. मात्र, त्यामुळे त्याच्या अन्ननलिका आणि श्वासनलिकेला इजा झाली.
तोंडात इजा झाल्याने रोहनला बोलताही येईना. त्यामुळे तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रोहनची जखम गंभीर असल्याने त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुण्याला हलवण्यात आलंय. सध्या रोहनवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर तालुका गटशिक्षण अधिकारी शिंदे यांनी पिंपळवाडी शाळेला भेट देवून सर्व माहिती घेतली. विद्यार्थी आणि इतर शिक्षकांचे जबाब नोंदवण्यात आले. अखेर पोलिसांनी संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.