1 रुपयाचा विमा आता 100 रुपयात? लवकरच पीकविम्याची फेररचना होणार?

शेतकऱ्यांना मिळणारा एका रुपयातील पीकविमा आता बंद होणार असल्याची माहिती आहे. एका रुपयात मिळणाऱ्या पीकविम्यासाठी आता शेतकऱ्यांना 100 रुपये मोजावे लागणार आहे. 

पुजा पवार | Updated: Feb 14, 2025, 08:08 PM IST
1 रुपयाचा विमा आता 100 रुपयात? लवकरच पीकविम्याची फेररचना होणार?
(Photo Credit : Social Media)

अनिरुद्ध दवाळे (प्रतिनिधी) अमरावती : शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या रकमेत लवकरच वाढ होणार आहे. एका रुपयात मिळणारा पीकविमा आता 100 रुपयात काढावा लागणार आहे. त्यासाठी लवकरच पीकविम्याच्या नियमात बदल करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणारा एका रुपयातील पीकविमा आता बंद होणार असल्याची माहिती आहे. एका रुपयात मिळणाऱ्या पीकविम्यासाठी आता शेतकऱ्यांना 100 रुपये मोजावे लागणार आहे. कारण पुढील काही दिवसात पीकविमा योजनेची फेररचना होणार आहे. तसा प्रस्तावच कृषी विभागानं राज्य सरकारकडे पाठवलाय. लवकरच सरकार पीकविम्याच्या नव्या प्रस्तावावर निर्णय घेणार आहे. 

पीकविम्याच्या नियमात सरकार बदल करणार आहे. त्याबाबत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारलं असता त्यांनी मात्र वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीट चोळण्याचं काम केलंय. एक रुपया भिकारीही घेत नाही मात्र आम्ही एका रुपयात पीकविमा देत असल्याचं कोकाटे म्हणालेत.
तर माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानाची त्यांच्याच पक्षाकडून दखल घेण्यात आलीय. आपल्या विधानानं कुणाच्याही भावना दुखावणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे अशी पक्षाची भूमिका असल्याचं आनंद परांजपे म्हणाले आहेत. 

पीकविमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार नियमात बदल करणार आहे. मात्र त्यामुळे बळीराजा शेतक-यांचं नुकसान होणार नाही,  याची काळजी घेण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झाली आहे.