ST Bus News in Marathi: लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा असतो. एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत. शिवशाही, शिवनेरी, एसी बस यासारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा असतानाच एसटी महामंडाळाने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. एसटी महामंडळाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात 'लालपरी' बसमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसंच, शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र, एसटी महामंडळाने या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा कोणताही विचार नसल्याचे समोर आलं आहे.
एसटी महामंडळाने एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 'एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही(वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही,' असा खुलासा महामंडळाने केला आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण 892 शिवशाही बस आहेत. त्यापैकी 500 बस धावत असून उर्वरित 392 बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या एसी आहेत. पहिल्यांदा शिवशाही बस 10 जून 2017 रोजी मुंबई-राजगिरी मार्गावर धावली होती. तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली होती.
खुलासा..
एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही(वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही.(जनसंपर्क अधिकारी) pic.twitter.com/CyrIINKV0Q
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) December 2, 2024
29 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात झाला होता. सकाळी भंडारा आगारातून बस गोंदियाला जात असताना गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ शिवशाही बस अनियंत्रीत झाली व रोडाच्या बाजूला उलटल्याने अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाले होते. सरकारने मृतांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.