सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्या नालायकांचा पराभव झालाय- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा होत आहे. 

Updated: Jun 19, 2019, 09:01 PM IST
सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्या नालायकांचा पराभव झालाय- उद्धव ठाकरे  title=

मुंबई : सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्या नालायकांचा पराभव झाला असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला संबोधताना ते बोलत होते. भरगच्च व्यासपीठाचे खरे मानकरी तुम्ही आहात असे गौरवोद्गावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून काढले. शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा होत आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर विश्वनाथ महाडेश्वर तसेच शिवसेनेचे सर्व जेष्ठ नेते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंचावर स्वागत केले. तसेच शिवसेनेच्या विजयी 18 खासदारांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. 

अशी भावना आधारित युती दुसरीकडे कुठे झाली नसल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आपला वाद हा तुझेमाझे करण्यासाठी नव्हते तर मुलभूत प्रश्नांसाठी होते. ज्या कारणामुळे वाद होता ते प्रश्न मिटल्याचे ते म्हणाले. आता वेडात मराठे वीर दौडले सात नव्हे तर यापुढे एक साथच असेही ते म्हणाले. शिवसैनिक एक वेगळे रसायन आहे. प्रेम करा म्हटलं तरी खूप करेल आणि लढ म्हणा म्हटलं तरी जीव तोडून लढेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

- आम्ही हिंदू आहोत म्हटल्यावर काही जणांना पोटशूळ उठतो
- समान भागीदार असाल तर वंदे मातरम म्हणायला लाज का वाटते
- मुख्यमंत्र्यांना इथं बोलवले तर इतरांच्या पोटात काय दुखतं ?
- मधल्या काळातील दुरावा नाहीसा झालेला आहे
- एकमेकांशी भांडून आता माती होवू द्यायची नाही
- ' एका युतीची पुढची गोष्ट' आता सुरू झालेली आहे
-तुम्हीही कार्यक्रम घ्या, तिथं मीही येतो..म्हणजे सगळं समसमान पाहिजे..

आता तर विरोधी पक्षही अस्तित्वात नाही. तुमच्याकडे काय जादू आहे माहिती नाही, आम्ही विरोध करणारेही तुमच्यात आलोय, विरोधी पक्षनेतेही तुमच्याकडे आले असेही यावेळी ते म्हणाले. 

आम्ही या हिंदुस्थानचे समान भागीदार आहोत असे म्हणणाऱ्या ओवेसींनी वंदे मातरम म्हणायला लाज का वाटते ? असा प्रश्न उद्धव यांनी ओवेसी बंधूंना विचारला. 

वाघ आणि सिंहाची जोडी एकत्र आल्यावर विजय निश्चित होता. म्हणूनच महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला. शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते हे या विजयाचे शिल्पकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळाला भूतकाळ करण्यासाठी आता वाटचाल करायची असल्याचे ते म्हणाले. 
या महाराष्ट्राच्या इतिहासात घडले नाही असा प्रचंड विजय आपल्याला मिळावायचा आहे. झालेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांसाठी काम करा असे सांगावे लागले नाही. कारण ही युती नैसर्गिक युती आहे असेही ते म्हणाले.

एखाद्या पक्षाच्या वर्धापन दिनाला दुसऱ्या पक्षाच्या नेत्यास बोलावण्याची आपल्याकडे परंपरा नाही. पण 53 व्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. या इतिहासाचा भाग होण्याची संधी दिल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.