'अधिवेशन काळात स्फोट...फाईल यायला सुरुवात', राऊतांचा महायुतीला सूचक इशारा

Sanjay Raut On Mahayuti: संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 14, 2024, 12:08 PM IST
'अधिवेशन काळात स्फोट...फाईल यायला सुरुवात', राऊतांचा महायुतीला सूचक इशारा title=
shiv sena sanjay raut slams bjp and mahayuti government formation delay

Sanjay Raut On Mahayuti: 'पूर्ण बहुमत मिळाल्यावरही पाशवी आणि सैतानी बहुमत ईव्हीएमच्या माध्यमातून ओरबडल्यावरही ही माणसं मंत्रिमंडळ विस्तार करू शकत नाही. सरकार देऊ शकत नाहीत. राज्यांमध्ये खून, दरोडे, बलात्कार, लुटमार सुरू आहे. आज मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघणार आहे. राजा उत्सवात मग्न आहे आणि रस्त्यावर खून पडत आहेत.आरोग्यमंत्री नाही ,गृहमंत्री नाही, शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत कसले राज्य आहे याला राज्य म्हणतात का?' असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

'तुम्हाला राज्याचे मंत्री ठरवता येत नाहीत. तुम्हाला दिल्लीत जावं लागतं. अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत मला या राज्याची चिंता वाटते आहे.. बहुमत असलेल्या सरकार राज्य चालू शकत नसेल ,तर या राज्याचे काय होणार. हळूहळू एक एक प्रकरण समोर येत जातील. तुम्ही कोणालाही मंत्री करा. तीन पक्षाचे लोक एकमेकांच्या विरुद्ध फायली आणून देणार. आहेत तशा फाईल यायला सुरुवात झालेली आहेत. तीन तंगड्या एकमेकांत अडकून महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेही नागपूर अधिवेशनासाठी जात आहेत. त्यामुळे याच अधिवेशन काळात एखादा स्फोट होऊ शकतो,' असा इशारा राऊतांनी दिला आहे. 
 
'राज्याला आरोग्य खातं नाही. आधीचे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. औषध खरेदी-विक्रीमध्ये लाखो कोटींचे कमिशन खात होते, हे समोर आलेलं आहे. या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खाते नाही त्या राज्यामध्ये दुसरे काय दुर्दैव घडू शकते. लाज वाटलं पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना एक महिना फक्त मंत्रिपदी कोण, मला कुठलं खातं मिळते, याची चर्चा आहे,' असंही राऊतांनी म्हटलं आहे. 

'हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला या भाजपवाल्यांना हिंदुत्व शिकवलं कोणी? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यांना बोट धरून हिंदुत्वाच्या वाटेवर नेलंय. या वाटेवर सुद्धा त्यांनी खड्डे केले आहेत. हे लोक काय आम्हाला हिंदुत्व शिकविणार. आमचे हिंदुत्व मतासाठी नाही तुमच्या आमच्याचं जीवन आहे,' असं राऊतांनी म्हटलं आहे.