सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने राजधानी दिल्लीतील दहशतवादी नेटवर्कचे कंबरडे मोडलं आहे. दिल्ली पोलिसांनी आयएसआयएस (ISIS) मॉड्यूलच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह 3 जणांना अटक केली आहे. मोहम्मद शाहनवाज (Shahnawaz) उर्फ शफी उज्जामा असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. शाहनवाजची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आणखी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. शाहनवाजवर तीन लाखांचे बक्षीस होते. शाहनवाज आणि अन्य एका व्यक्तीला दिल्लीतून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तिसऱ्या संशयिताला दिल्लीबाहेरून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाहनवाज हा पुण्यातून (Pune) फरार झाला होता.
पुणे आयएसआयएस मोड्युल प्रकरणी फरार शाहनवाज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शाहनवाजला अटक केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने शाहनवाजला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केले होते. महत्त्वाची बाब म्हणजे शाहनवाज हा पुण्यात देखील वास्तव करत होता. 18 जुलै रोजी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांसोबत शाहनवाज देखील होता. मात्र पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने पळ काढला होता. मात्र आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शाहनवाजसह आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीत राहून शाहनवाज आयएसआयएसच्या स्लीपर सेलसाठी लोकांची भरती करण्याचा प्रयत्न करत होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आणखी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. सध्या शाहनवाजच्या चौकशीच्या आधारे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दिल्लीत शाहनवाज, रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फयाज शेख हे तीन इसिस दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनआयए आणि पुणे पोलिसांनी दोन दिवस मध्य दिल्लीत अनेक ठिकाणी छापे टाकले होते. देशातील इतर यंत्रणाही दिल्ली-एनसीआरमध्ये या दहशतवाद्यांचा सक्रियपणे शोध घेत होत्या. अखेर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या तिघांना अटक केली आहे.
एनआयएकडून वॉन्टेड म्हणून घोषित
राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या महिन्यात आयएसआयएस पुणे मॉड्यूल प्रकरणात फरार आरोपी शाहनवाज विरोधात रोख बक्षीस जाहीर केले होते. मोहम्मद शहनवाज, शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि ताला लिवाकत खान या चारही आरोपींची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये देणार आहे, अशी माहिती एनआयएने दिली होती. तसेच या आरोपीची माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाणार असल्याची हमी देखील एनआयएने दिली होती.