Shivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब

Maharashtra Political News Viral Video : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वसामान्यांचं मतही विचारात घ्या. सत्ताधाऱ्यांनो जाब विचारतोय एक नागरिक... लक्ष असू द्या.   

Updated: Feb 22, 2023, 12:21 PM IST
Shivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब title=
Shahir Vikas Lambore song on Shivsena Symbol issue goes Viral Maharashtra Politics latest news

Maharashtra Political News Viral Video : 'संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना', असं म्हणत राज्यात अनेक वर्षांपासून दबदबा असणाऱ्या (Shivsena) शिवसेनेवरून सुरु असणाऱ्या राजकारणावर एका तरुण शाहिरानं शब्दांमार्फत प्रहार केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिला आणि यानंतर ठाकरेंनी वाढवलेली, जोपासलेली शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांना पाठींबा असणाऱ्या आमदारांच्या बाजूनं गेली. पक्षाचं नाव आणि चिन्हं सर्वकाही आता शिंदे गटाकडे असल्यामुळं ठाकरे गटाकडून याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

'रावणालाही शिवधनुष्य पेललं नाही...', असं म्हणत खुद्द (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी समर्थकांना संबोधित करत त्यांचा संताप शमवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असतानाच इथे आता सर्वसामान्यसुद्धा व्यक्त होऊ लागले आहेत. अनेकांनीच ठाकरेंना सहानुभूती देत त्यांची बाजू उचलून धरण्याचाही प्रयत्न केला आहे. असाच प्रभावी प्रयत्न करत मुळच्या कोकणातील असणाऱ्या आणि नोकरीसाठी मुंबईत (Mumbai) राहणाऱ्या युवा कवी/ लेखक विकास लांबोरे यांनी एक (Video) व्हिडीओ शेअर केला. 

हेसुद्धा वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्ष प्रमुख पदही जाणार? एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख होणार?

 

स्वत:च्या शब्दांत त्यांनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंपुढे उदभवलेल्या परिस्थितीला वाचा फोडली आहे. सर्वोच्च न्यायालयाला विनंती करत आमच्याही वेदना ऐका अशी साद त्यांनी आपल्या काव्यातून घातली आहे. 

'सत्ताधाऱ्यांनो बाळगा लाज, जाणा लोकवेदना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कोणी शिवसेना?',

गीतातील या ओळी वाचून शिवसेनेची अशी अवस्था करणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या विकास लांबोरे यांच्या या गीताची अनेकांनी दखल घेतली असून, सध्या त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे विकास लांबोरे आहेत तरी कोण? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळं विकास लांबोरे यांचं नाव चर्चेत आलं. नोकरीसाठी पुण्यात असणारे लांबोरे मुळचे कोकणच्या रत्नागिरी येथील लांजाचे रहिवासी. ‘भोंबडातला डोंगळा’ हा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह. करतो इदवास भगत बुवा, पावनं जाऊ नका जेवल्याशिवाय या गीतांनी त्यांना विशेष लोकप्रियता दिली. सध्या हाच चेहरा ‘चोरली कुणी शिवसेना’ या गीतामुळं घराघरात पोहोचला आहे. 

‘चोरली कुणी शिवसेना’ हे संपूर्ण गीत एकदा पाहाच... 
सुप्रीम कोर्टा तुम्हा विनवणी, ऐकाव्या वेदना
संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना;
चार चौघात केलाय गुन्हा… सांगा चोरली कोणी शिवसेना?

मराठी मुलखाचा अभिमान, शिवसेना अन् धनुष्यबाण
सत्तेचा हा माज कशाला, विचारी जनता जनार्दन
सत्ताधाऱ्यांनो बाळगा लाज, जाणा लोकवेदना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कोणी शिवसेना?

याची डोळा, याची देही, फोफावली ही हुकूमशाही
म्हणे जगात सर्वात मोठी, भारतात या लोकशाही
सरन्यायाधीश तुम्हा साकडं, वाचवा हो संविधाना
चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कोणी शिवसेना?