Electric Hookah: नोकरी, व्यवसाय अशा सध्या धावपळीत पालक आपल्या मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीयत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं हे सध्याच्या घडीला पालकांसाठीचे आव्हानात्मक काम आहे. लहान मुलांच्या मनात काय चालले आहे? हे समजणे खूपच कठीण आहे. पण याचे दूरगामी परिणाम किती वाईट होऊ शकतात, याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून पालकांच्या पायाखालची वाळू सरकू शकते.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आलाय. शाळेच्या शिक्षिकेने हा व्हिडीओ बनवलाय. ज्यात त्या एक वस्तू दाखवून त्याबद्दल पालकांना जागृक करत आहेत. शिक्षिका या व्हिडीओत म्हणतायत, 'हा एक इलेक्ट्रिक हुक्का आहे. जोइयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगेत सापडला आहे. यातून एक स्पंच बाहेर निघतो. सुरुवातीला शिक्षकांना काही कळाले नाही. पण विद्यार्थी 2-3 दिवस सतत ही वस्तू शाळेत आणत होता. ज्याची ओळख पटवण्यासाठी आम्हाला 3 दिवस लागले'.
'हा एक इलेक्ट्रीक हुक्का आहे. फ्लेवर्ड हुक्का आहे. आम्ही पालकांना विचारल पण त्यांनादेखील हे काय आहे हे त्यांना माहिती नव्हतं. अशा वस्तूंचा वापर बालक नशेसाठी करत असतात. तुमच्या पाल्यांकडे असलेल्या वस्तूंवर लक्ष ठेवा. नशेची सुरुवात इथूनच होते', असे आवाहन या शिक्षिकेने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.
@saharansantosh या हँडलवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. आत्तापर्यंत तो 9 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे शिक्षिका समजावून सांगत आहेत. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे आणि त्यांच्याशी नियमित बोलत राहावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. मुलांसोबत चांगला वेळ घालवणे आणि त्यांचे वागणे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण व्यसनाची सुरुवात अनेकदा छोट्या गोष्टींपासून होते, असेही शिक्षक आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहेत.