120 कोटी मोबाईल युजर्सना सरकारचा इशारा, 'या' नंबरवरुन आलेले कॉल्स चुकूनही नका उचलू!

TRAI New Rules: देशात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मोबाईलच्या माध्यमातून लाखो रुपयांना लुटल्याच्या तक्रारी दररोज सायबर पोलिसांत प्राप्त होत असतात. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 4, 2024, 07:45 PM IST
120 कोटी मोबाईल युजर्सना सरकारचा इशारा, 'या' नंबरवरुन आलेले कॉल्स चुकूनही नका उचलू! title=
ट्राय नवीन नियम

TRAI New Rules: भारतात मोबाईल युजर्सची संख्या फार मोठी आहे. शहरापासून ते गावखेड्यापर्यंत मोबाईल प्रत्येकाच्या हातात पाहायला मिळतो. एकमेकांशी संपर्कात राहण्यापासून ते कॅमेरा, ईमेल्ससारख्या अनेक गोष्टींसाठी मोबाईलची गरजही लागतेच. पण याच गोष्टीचा गैरफायदा काही समाजकंटक घेतात. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी फसवणुकीचा धंदा सुरु केला आहे. त्यामुळे देशातील 120 कोटी मोबाईल युजर्ससाठी सरकारने महत्वाचा इशारा दिला आहे. याबद्दल जाणून घेऊया. 

देशात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मोबाईलच्या माध्यमातून लाखो रुपयांना लुटल्याच्या तक्रारी दररोज सायबर पोलिसांत प्राप्त होत असतात. लुटणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचणे खूपच कठीण झालेले असते. एखादा फोन येतो आणि आपल्या लक्षात येईपर्यंत बॅंक अकाऊंट रिकामी झालेले असते. असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने देशातील 120 कोटींहून अधिक मोबाइल यूजर्सना एक नवीन इशारा जारी केला आहे. 

काय आहे इशारा?

सरकारने मोबाईल यूजर्सना आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबाबत हा इशारा दिला आहे. दूरसंचार विभागाने मोबाईल यूजर्सना विशिष्ट क्रमांकांवरून येणारे कॉल अटेंड न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मोबाईल यूजर्सनी दूरसंचार विभागाच्या चक्षू पोर्टलवर अशा कॉलची तक्रार करावी, असे आवाहनदेखील केले आहे.

या नंबरवरून आलेले कॉल उचलू नका

DoT ने त्यांच्या अधिकृत X हँडलद्वारे या आंतरराष्ट्रीय क्रमांकांची माहिती शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट प्रत्येक मोबाईल यूजर्ससाठी अत्यंत महत्वाची आहे. दूरसंचार विभागाने यूजर्सना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन येणारे फसवणुकीचे कॉल टाळण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी क्रमांकावरुन आलेले कॉल्स अटेंड करण्यापूर्वी थांबा आणि विचार करा, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

वेळीअवेळी आपल्या मोबाईलची बेल वाजते. महत्वाचा कॉल असेल म्हणून आपण पाहतो तर नंबर ओळखीचा नसतो. तो भारतातील नाहीय, असेही लक्षात येते. तरीही अनेकजण कोण असेल या उत्सुकतेपोटी फोन उचलतात. पुढे यातील अनेकांची फसवणूक झाल्याचे समजते. आजकाल मोबाईल यूजर्सन +77, +89, +85, +86, +87, +84 इत्यादी नंबरवरून बनावट आंतरराष्ट्रीय कॉल येतात. दूरसंचार विभाग किंवा ट्राय असे कॉल करत नाही. त्यामुळे अशा कॉलची तक्रार Chakshu पोर्टलवर करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. 

अशा आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येणारे कॉल हे इंटरनेट जनरेट केलेले असतात. म्हणजेच ते इंटरनेटद्वारे केले जातात. हॅकर्स या नंबरवरून मोबाईल यूजर्सना कॉल करतात. आम्ही ट्राय किंवा दूरसंचार विभागाचे अधिकारी असल्याचे ते भासवण्याचा प्रय्तन करतात. आणि यूजर्सना त्यांचे कनेक्शन बंद करण्यास सांगतात. अशाप्रकारे आपल्या जाळ्यात अडकवून ते लोकांची फसवणूक करतात, असे सांगण्यात आले आहे. 

ताबडतोब चक्षूला कळवा

सरकारने काही महिन्यांपूर्वी चक्षू पोर्टल लाँच केले आहे. ज्याद्वारे यूजर्स त्यांच्या फोनवर येणाऱ्या बनावट कॉलची तक्रार करू शकतात. पोर्टलवर अहवाल दिल्यानंतर सरकार त्या क्रमांकांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकते. तुम्हाला तुमच्या फोनवर या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येत असल्यास, ते उचलू नका आणि चक्षू पोर्टलवर त्यांची तक्रार करा, असे आवाहन दूरसंचार विभागाने मोबाईल युजर्सना केले आहे.

भारतातील वाढत्या सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने नवीन नियम लागू केले आहेत. फोनवर बनावट किंवा स्पॅम कॉल येऊ नयेत, यासाठी टेलिकॉम कंपन्यांना नवीन डीएलटी प्रणाली लागू करण्याच्या सूचना 1 ऑक्टोबरपासून देण्यात आल्या आहेत. यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून आलेल्या कॉलवर प्रमोशनल कॉल असे लिहून आल्याचे तुम्ही पाहिले असेल. तसेच मेसेज ट्रेसिबिलिटी नियम 11 डिसेंबरपासून लागू होणार आहे. यानंतर सायबर गुन्हेगारांनी पाठवलेले संदेश सहज ट्रॅक करता येणार आहेत.