Ajit Pawar On Suresh Dhas Allegations Against Dhananjay Munde: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशीसंबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला अटक झाल्यापासून मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हे फारच आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. मंगळवारी त्यांनी याचसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मात्र धस यांच्याकडून मुंडेंवर होत असलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी मुंडेंच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या खास शैलीत धस यांचा समाचार घेतला.
बीडमधील घटनेबद्दल बोलताना अजित पवारांनी मंगळवारी सूचक पद्धतीने मुंडेंचा संबंध असला तरच राजीनामा घेतला जाईल असं म्हटलं. " बीडमध्ये जी घटना घडली आहे त्यासंबंधी चौकशी सुरु आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीने प्रयत्नही सुरु आहेत. आणखी काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र संबंध असेल तर निश्चित कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांसह आमचीही आहे," असं अजित पवारांनी मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
पत्रकारांनी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून होत असलेल्या आरोपांचा संदर्भ देत प्रश्न विचारला असता अजित पवारांनी जरा संतापलेल्या स्वरातच त्यावर प्रतिक्रिया नोंदवली. सुरेश धसांचं नाव ऐकताच अजित पवारांनी, "सुरेश धसला काय वाटतं त्याच्या मला काही देणंघेणं नाही," असं म्हटलं. पुढे बोलताना, "मी सरकारमध्ये भाजपाबरोबर आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करुन महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं असा प्रयत्न असतो. एकनाथ शिंदेंची यात महत्त्वाची भूमिका आहे. निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसून निर्णय घेत असतो. जर वेगवेगळ्या पक्षातील खालचे कार्यकर्ते बोलू लागले तर त्याला काही अंतच उरणार नाही. (भाजपाची) जी काही भूमिका असेल तर अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे सांगतील," असं अजित पवारांनी धस यांचा अप्रत्यक्षपणे 'खालचे कार्यकर्ते' असा उल्लेख करत म्हटलं.
नक्की वाचा >> संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मुंडे म्हणाले, 'क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचे...'
"मी वरिष्ठ पातळीवर सर्वांच्या संपर्कात आहे. खालचे लोक काय बोलतात यावर उत्तर देण्यास बांधील नाही," असंही अजित पवारांनी धसांकडून होत असलेल्या आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना सांगितलं आहे. मी कोणाला पाठीशी घालणार नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभाव आणि कामाची पद्धत माहिती आहे, असंही सांगायला अजित पवार विसरले नाहीत.