Sanjay Raut on Legislature Notice: विधिमंडळाच्या हक्कभंग नोटीसला संजय राऊतांचं उत्तर, आता मुदतवाढ मिळणार की थेट शिक्षा...

Sanjay Raut on Assembly Notice: खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी राज्याच्या विधिमंडळाने (Maharashtra Legislature) पाठवलेल्या हक्कभंगाच्या नोटीशीला उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी पत्र लिहिलं असून आपलं वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतं होतं असं सांगितलं आहे. तसंच उत्तर देण्यासाठी आणखी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली आहे.   

Updated: Mar 8, 2023, 03:28 PM IST
Sanjay Raut on Legislature Notice: विधिमंडळाच्या हक्कभंग नोटीसला संजय राऊतांचं उत्तर, आता मुदतवाढ मिळणार की थेट शिक्षा...  title=

Sanjay Raut on Assembly Notice: खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधिमंडळाने (Maharashtra Legislature) पाठवलेल्या हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचं विधिमंडळ हे ‘चोर’मंडळ आहे असं विधान केलं होतं. यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ घालण्यात आला होता. संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडत तो मंजूर करण्यात आल्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली होती. या हक्कभंग नोटीसला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. 

मुदतवाढ मिळणार की थेट शिक्षा...

खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळास पत्र लिहून हक्कभंग नोटीसवर स्पष्टीकरण देण्यासाठी अधिक वेळेची मागणी केली आहे. विधिमंडळ कार्यालयाकडून राऊतांच्या पत्रावर विचारविनिमय सुरु आहे.थोड्याच वेळात विधिमंडळ कार्यालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे आता खासदार राऊत यांना मुदतवाढ मिळणार की थेट शिक्षा सुनावणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

संजय राऊतांनी पत्रात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं म्हटलं आहे. विधिमंडळाला चोर म्हटलं नाही, एका विशिष्ट गटाला चोर म्हटलं असा दावा त्यांनी पत्रात केला आहे. हे वक्तव्य विधिमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरिता केलं नसून, एका विशिष्य गटापुरतं होतं असं ते म्हणाले आहेत. तसंच विधिमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार असा शब्द त्यांनी केला आहे. मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासून पाहा असं त्यांनी सांगितलं आहे. 

संजय राऊतांनी पत्रात काय म्हटलं आहे?

मा. प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
जय महाराष्ट्र! 

कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधान मंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला 3 मार्च 2023 पर्यंत सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मुदत दिली. 

1) मी आपणास नम्रपणे नमूद करु इच्छितो की, मी 4 मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणं शक्य झालं नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा  करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी. 

2) महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी स्वत: अनेक वर्ष राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहित आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य केलं नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे, हे लक्षात घ्यावे. 

तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी

संजय राऊत काय म्हणाले होते?

विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, असं कोर्टाने सांगितलं आहे. महाराष्ट्रात विधिमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, लोकांची गर्जना काय आहे काल आपण धाराशिवला पाहिले. ज्या पद्धतीने आमदार बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आला तो जाब म्हणजे शिवगर्जना. ही गर्जना पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात जात आहोत, असे संजय राऊत यांनी कोल्हापूर येथे म्हटलं होतं.