Sangli 500 Rs Notes Found In Stream Of Water: पैशांचा पाऊस पडला अशी म्हण यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. किंवा पैसा काय झाडाला लागतो का? असा प्रश्न तुम्ही अनेकदा ऐकला असेल. मात्र खरोखरच असे फुकट पैसे मिळू लागले तरी किती बरं होईल? असा विचार तुम्ही कधी केला आहे का? सांगलीमधील लोकांना खरोखरच हा अनुभव आला आहे. येथे चक्क एका ओढ्यामधून 500 रुपयांच्या नोटा वाहून आल्या आहेत. या नोटा गोळा करण्यासाठी स्थानिकांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
समोर आलेल्या माहितीनुसार, सांगलीमधील आटपाडीमधील ओढ्याला नोटांचा हा पूर आला आहे. या ओढ्यामधून 500 रुपयांच्या नोटा वाहून येत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नोटा गोळा करण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाली आहे. गावातील अंबाबाई ओढ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा वाहून आल्या की लोक ओढ्यात उतरुन नोटा गोळा करु लागले. शनिवारी या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. ओढ्याच्या कडेलाच हा बाजार भरत असल्याने बाजारासाठी आलेल्या लोकांना ओढ्यातून 500 च्या नोटा वाहत आल्याचं दिसून आलं. त्यानंतर अनेकांनी आपल्या हातातील आहे ते काम सोडून या वाहत येणाऱ्या नोटा गोळा करण्यासाठी ओढ्याकडे धाव घेतली. अगदी दुचाकी थांबवून अनेक तरुण ओढ्यातून वाहत येणाऱ्या या नोटा गोळा करण्यासाठी ओढ्यात उतरले.
प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी या ओढ्यातून वाहत आलेल्या जवळपास दोन ते अडीच लाख रुपये मूल्य असलेल्या 500 च्या नोटा गोळा केल्या आहेत. या घटनेची माहिती आटपाडी पोलिसांना काही वेळाने मिळाली. माहिती मिळताच पोलिसांची एक तुकडी घटना स्थळी पोहोचली. मात्र तोपर्यंत अनेक स्थानिक नागरिक या ठिकाणी नोटा गोळा करुन तिथून निघून गेले होते. सध्या पोलीस या नोटा कुठून आल्या? याचा शोध घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात 500 च्या नोट्या एवढ्याच्या ओढ्यात कशा काय आल्या? या सर्व नोटा नेमक्या कोणाच्या मालकीच्या आहेत? त्या ओढ्यात कोणी आणि नेमक्या कोणत्या कारणाने टाकण्यात आल्या? या नोटा जाणूनबुजून ओढ्यात टाकल्या गेल्या की एखाद्या अपघाताने त्या ओढ्यात पडल्या? या संपत्तीचा स्रोत काय आहे? यासंदर्भात कोणही माहिती समोर आलेली नाही. सध्या स्थानिक नागरिक नोटा गोळा करत असल्याचे मोबाईल कॅमेरामध्ये शूट करण्यात आलेले व्हिडीओ व्हायरल झालेत.
नक्की वाचा >> 92476403800 रुपयांचा मालक आहे हा पुणेकर! भारतातील सर्वात नवा अब्जाधीश नेमकं करतो तरी काय?
सदर अंबाबाई ओढ्यामध्ये नक्की किती नोटा वाहत आल्या याचाही ठोस आकडा उपलब्ध नाही. मात्र ओढ्यातून वाहून आलेल्या सर्वच्या सर्व नोटा या खऱ्या म्हणजेच चलनी नोटा असून त्यामुळेच त्या गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. तसेच नोटा घेऊन तिथून निघून गेलेल्यांकडून पोलीस नोटा गोळा करणार का? नोटा काढून घेऊन गेलेल्यांचा शोध पोलीस कसा घेणार असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही नसल्याने या लोकांचा शोध कसा घ्यायचा हा पोलिसांसमोर प्रश्न आहे.