Maval lokSabha Election 2024 : सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रोहित पवार (Rohit Pawar) जोरदार प्रचारसभा घेताना दिसत आहेत. नुकतंच रोहित पवार यांनी मविआचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे (sanjog waghere) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहून संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी स्वाभिमानी जनता आणि निष्ठावंत कार्यकर्ते ही निवडणूक हातात घेऊन संजोग वाघेरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडलं अन् पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या पराभवाचा बदला घेणार असल्याचा विडा उचलला.
श्रीरंग बारणेंच्या प्रचारात अजित पवार सहभागी झाल्यावरून रोहित पवारांनी त्यांना डिवचलं. मावळ लोकसभेत मुलाचा पराभव केला त्यांचाच प्रचार अजित पवार करतायत. अजितदादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्यानं ते बारणेंचा प्रचार करतायेत अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. पार्थने चिंता करू नये. मी त्यासाठीच मावळात आलोय. पार्थचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घेणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आलीय. पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय. शासनाकडून आदेश पारित असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पार्थ पवार अजित पवारांचा मोठा मुलगा असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता ते आई सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय आहेत. तर शानशौकतीसाठी सुरक्षा कुणाला देऊ नये, गरज असेल तरच सुरक्षा द्या असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलंय. तर मोदींसारखी सुरक्षा पार्थ पवारला द्यावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. 2019 मधील आपलाच मताधिक्याचा विक्रम मोडून पुन्हा निवडून येऊ. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत, असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे.