पुणेकरांनो सावधान! पोलिसांचा सर्वात मोठा निर्णय; रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत...

Pune Police Night Duty Nakabandi: पुणे पोलिसांनी यासंदर्भात मोठी तयारी केली आहे. यासाठी विशेष तुकड्या तयार करण्यात आल्या असून कारवाईसंदर्भातील जबाबदारी उच्च अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 22, 2024, 09:53 AM IST
पुणेकरांनो सावधान! पोलिसांचा सर्वात मोठा निर्णय; रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत... title=
पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - पीटीआय)

Pune Police Night: पुणे शहरासंदर्भात पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शहरामध्ये दररोज रात्री नाकाबंदी केली जाणार आहे. या माध्यमातून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी 27 ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या नव्या कारवाईच्या मोहिमेसंदर्भातील माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी वाहतुकीसंदर्भातील कठोर कारवाईला सुरुवात केल्यानंतर आता ही दुसरी अशी मोहिम आहे ज्यामध्ये रस्त्यावरील वाहनचालकांना अधिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

रात्री 11 ते पहाटे 3 दरम्यान...

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे 3 वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. नाकाबंदीसाठी शहराबरोबरच उपनगरातील 27 ठिकाणे पोलिसांकडून निश्चित करण्यात आली आहेत. या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह एकूण सव्वाशे पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. बेशिस्त वाहनाचालकांना शिस्त लावण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

यापूर्वीच नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकाचे वाहन जप्त केले जाणार आहे,’ असेही अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार असून पोलिसांकडून मद्यपींविरोधात कारवाई कारवाई केली जाईल.

दिवसाही मोठा बंदोबस्त

वाहतुकीच्या नियमांबद्दल बेशिस्त पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी आता पोलिसांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. पुण्यात वाहतुक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करणार आहेत. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपोझिट साईडने म्हणजेच विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास दोषी व्यक्तीचं वाहन सहा महिन्यांसाठी जपत केलं जाणार आहे. तसेच पुणे पोलिसांकडून आता ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध, सिग्नल तोडणाऱ्यांविरुद्ध तसेच ड्रींक अँड ड्राईव्हविरुद्ध मोहीम सुरु करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी गेल्या 15 दिवसमध्ये तब्बल 25 हजार वाहनचालकांवर वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी मागील 15 दिवसांमध्ये 200 जणांविरुद्ध वाहन जप्तीची कारवाई केली असून आता सहा महिने त्यांची वाहने पुमे पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत. म्हणजे या पुणेकरांना आता थेट मार्च आणि एप्रिल महिन्यात या वाहनांचा ताबा मिळणार आहे. पुणे पोलिसांकडून शहरामध्ये दोन शिफ्टमध्ये तब्बल 850 पोलीस कर्मचारी रस्त्यावरील वाहतुकीच्या नियंत्रणाचं काम करत आहेत. त्यानंतरही वारंवार नियमांचं उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.