अतिउत्साह नडला! मुंबईतील 29 वर्षीय तरुण नको त्या धाडसामुळं खंडाळा दरीत भरकटला आणि 6 तासांनंतर...

Lonavla Khandala News : नको ते धाडस केल्याने पर्यटक तरुण खंडाळा दरीत भरकटला सहा तासांच्या रेस्क्यु ऑपरेशननंतर... पाहा नेमकं काय घडलं   

Updated: Jan 4, 2025, 07:59 AM IST
अतिउत्साह नडला! मुंबईतील 29 वर्षीय तरुण नको त्या धाडसामुळं खंडाळा दरीत भरकटला आणि 6 तासांनंतर...  title=
(प्रतिकात्मक छाया)/ Pune maval lonavla 29 years old man went missing in a valley later rescued after 6 hours

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ : हिवाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळं अनेकांचेच पाय गिरीस्थानांकडे वळत आहेत. आठवडी सुट्ट्यांमध्ये तर, मुंबई, पुण्यानजीक असणाऱ्या अनेक भागांमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. निसर्ग आणि हवामानाच्या बदललेल्या रुपड्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून ही धडपड केली जाते. पण, कित्येकदा या उत्साही वातावरणारा अतिउत्साहाचं गालबोट लागतं. लोणावळा, खंडाळा क्षेत्रात सध्या अशीच एक घटना घडली आहे. 

मुंबईतील एक 29 वर्षीय तरुण पर्यटनासाठी लोणावळा खंडाळा परिसरात आला होता. मात्र खंडाळा येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी या तरुणाने थेट (Mumbai Pune Expressway) पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या दरीमध्ये उतरण्याचं ठरवलं. एक्सप्रेस हायवेच्या लगत असलेला खंडाळा बोगदा आणि खंडाळा एक्झिटच्या दरम्यान ही दरी आहे. 

लोणावळा पोलिसांना 112 नंबरच्या हेल्पलाईन वरून तरुणाचा फोन आला आणि तो दरीत हरवला असल्याची माहिती त्यानं स्वत:च पोलिसांना दिली. घटनास्थळी तातडीनं पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यु टीमला पाचारण केलं. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार हा तरुण खंडाळा घाटातील सुमारे 200 मीटर खोल दरीत भरकटला होता. हा युवक ज्याठिकाणी खाली गेला त्या ठिकाणाचा रेस्क्यु टीम ला अंदाज येत नसल्याने त्याचं अचूक ठिकाण शोधण्यासाठी काही तासांचा वेळ गेला. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : मुंबई वगळता उर्वरित राज्यात पुन्हा वाढला गारठा; उत्तर भारतात रक्त गोठवणाऱ्या थंडीची लाट 

प्रचंड प्रयत्नानंतर अखेर या युवकाने रेस्क्यू टीम आणि पोलिसांना पाठवलेल्या व्हिडीओच्या मदतीने ठिकाणाचा अंदाज बांधून बचाव पथक त्याच्याजवळ पोहचलं. ज्यानंतर दोराच्या मदतीने या युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. तब्बल सहा तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं सांगण्यात आलं. तरुणानं केलेल्या या नको त्या धाडसामुळे प्रसंग वेळीच सावरला नसता तर, गंभीर संकटही ओढावू शकत होतं. त्यामुळं अनोळखी ठिकाणी जाण्याचं धाडस पर्यटकांनी करू नये असं आवाहन लोणावळा पोलीस तसंच शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं केलं आहे.