Pune Bypoll Election Results 2023 : कसबा पोटनिवडणुकीत 14 उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त झाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने वगळता उरलेल्या सर्व 14 जणांची डिपॉझिटही गेली आहेत. या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची नोटीस शुक्रवारी पाठविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. कसबा मतदारसंघात डिपॉझिट वाचवण्यासाठी नोटा वगळता झालेल्या एकूण मतदानापैकी 16 टक्के म्हणजे 22 हजार 800 एवढी मतं आवश्यक होती. मात्र धंगेकर आणि रासने यांनाच हा आकडा पार करता आला. विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गात 10 हजार रूपये तर अनुसुचित जाती जमाती उमेदवाराला 5 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते.
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. मात्र, 14 जणांना आपली निवडणुकीसाठीची अनामत रक्तम वाचवता आलेली नाही. त्यांना अपेक्षित मते पडलेली नाहीत. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 73 हजार 194 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 62 हजार 244 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 10 हजार 950 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
अभिजित बिचुकलेही (Abhijit Bichukale) हेही निवडणुकीच्या रिंगाणात होते. त्यांना किती मते पडलीत याची उत्सुकता होती. कसब्यातील मतमोजणी पूर्ण झाली असून बिचुकलेला किती मतं पडली यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. बिचुकेले यांना या निवडणुकीमध्ये केवळ 47 मतं मिळाली आहेत. तसेच ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनाही (Anand Dave) मतांच्या बाबतीत 300 चा टप्पांही ओलांडता आला नाही. ब्राह्मण उमेदवाराच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेल्या या मतदारसंघामध्ये दवेंना केवळ 296 मतं मिळाली आहे. या दोघांनी आम्हीच जिंकणार असा दावा केला होता. मात्र, मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरुन दिसून आलेय. कसब्यातील 1397 मतदारांनी कोणताही उमेदवार योग्य नसल्याचं दर्शवणारा नोटा हा पर्याय निवडला आहे.
भाजपचे बालेकिल्ला असणारा कसबा पेठ मतदारसंघ यावेळी काँग्रेसच्या हातात गेला आहे. यावेळी भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न देता दुसरा उमेदवार दिला. भाजपला याचा फटका कसबा पेठमध्ये बसला आहे. कसबा पेठ येथे भाजपला नेहमी कौल मिळत आला आहे. मात्र, पोटनिवडणुकीच्या माध्यमातून तब्बल 28 वर्षानंतर भाजपचा मतदारसंघातत पराभव झाला आहे. यापूर्वी 1992 मध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अण्णा थोरात यांनी गिरीष बापट यांचा पराभव केला होता. त्यानंतर 1995 पासून ते 2019 पर्यंत भाजपने विजयी मिळवला आहे. खासदार गिरीश बापट आजारी असताना त्यांना व्हिलचेरवर आणून प्रचारात उतरवले. यामुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली. तसेच भाजपवर पैसे वाटपाचा आरोप झाला. याचाही फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. आजारी असताना त्यांना प्रचारात उतरवणे यामुळे चुकीचा संदेश मतदारांमध्ये गेला.