Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: ठिकाण - दादरमधील शिवाजी पार्क... वेळ- 10 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे दहाच्या आसपास... अचानक मोठ्याप्रमाणात पोलिसांच्या गाड्या दिसू लागतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानासमोर थांबतात. या गाड्या ज्या गाडीला सुरक्षा पुरवत इथे पोहचलेल्या असता त्या गाडीमधून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडतात आणि राज ठाकरेंच्या घरात प्रवेश करतात यानंतर पुढील तासभर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी आणि शक्यतांची चर्चा सुरु होते. असेच काहीतरी चित्र आज मुंबईतील दादरच्या मध्यवर्ती भागात दिसलं. या भेटीनंतर अनेक शक्यतांची चर्चा सुरु झाली. याच शक्यतांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेली शक्यता म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि भाजपाची युती होणार? याच संभाव्य युतीसंदर्भात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे महापालिकेच्या निवडणुकीत मनसे भाजप एकत्र येण्याची पुन्हा येण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या चर्चेनुसार मनसे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाबरोबर सामंजस्याने काही जागा सोडणार असून या मोबदल्यात मनसेलाही मोठा फायदा होणार आहे. भाजपाच्या विधान परिषदेच्या जागेवरुन राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना आमदारकी दिली जाण्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. अर्थात या दोन्ही नेत्यांनी या भेटीसंदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका नोंदवलेली नसल्याने भेटीतील मूळ चर्चेबद्दलचं गूढ कायम आहे.
राज्यामध्ये महायुतीमधील पक्षांना अभुतपूर्व यश मिळाल्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे असतानाच त्यांनी अशापद्धतीने स्वत: 'शिवतीर्थ'वर जाऊन भेट घेतल्याने मनसे महायुतीमधील घटक पक्ष होणार का? याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीदरम्यान मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडेही सोबत असल्याचं भेटीमधील फोटोंमधून स्पष्ट होत आहे.
नक्की वाचा >> 'राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला...'; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला
या भेटीनंतर अमित ठाकरेंना भाजपाच्या राखीव जागेवरुन विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दादर-माहिम मतदारसंघातील संघर्षादरम्यानही अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर पाठवण्याची चर्चा असल्याच्या बातम्या समोर आलेल्या. मात्र या ठिकाणी झालेल्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसनेचे सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंच्या संघर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी 1316 मतांनी निसटता विजय मिळवला. हा मतदारसंघ मनसे आणि शिंदेंच्या सेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला होता. यावरुन अनेकदा वाटाघाटींचे प्रयत्न झाल्याचंही दिसून आलं होतं. मात्र या वादात दोन्ही पक्षांच्या हाती निराशच लागली. आता मनसेनं लोकसभा निवडणुकीदरम्यान घेतलेल्या 'बिनशर्त पाठिंबा' भूमिकेसाठी मनसे प्रमुखांच्या लेकाच्या गळ्यात विधापरिषदेच्या आमदारकीची माळ पडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.