Pramod Mittal Business in UK: काळ खूप बलवान असतो.... राजाचा रंक अन् रंकाचा राजा कधी होईल हे कुणालाच कळत नाही. सुख-दुःख, विजय-पराजय, श्रीमंती-गरिबी, उदय-पतन अशा भरती ओहोटी सारख्या अनेक घटना मनुष्याच्या आयुष्यात घडत असतात. असचं काहीसं प्रसिद्ध उद्योगपती प्रमोद मित्तल यांच्यासोबत घडले आहे. लेकीच्या लग्नात 550 कोटी उधणारे प्रमोद मित्तल आता देशोधडीला लागले आहेत. त्यांचे सर्व साम्राज्य धुळीस मिळाले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रमोद मित्तल यांचे नाव घेतले जात होते. आता त्यांचं अब्जावधींचं साम्राज्य संपुष्टात आले आहे. 2020 मध्ये प्रमोद मित्तल हे दिवाळखोर झाले. त्यानंतर लंडन कोर्टानं त्यांना दिवाळखोर म्हणून घोषित केले. प्रमोद मित्तल हे प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे बंधू आहेत. प्रमोद मित्तल स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडचे म्हणजेच आत्ताची जेएसडब्ल्यू स्टील कंपनी याचे अध्यक्ष राहिले होते. एकेकाळी त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जायची.
आलिशान लाईफस्टाईल आणि खर्चीक सवयींसाठी ते ओळखले जायचे. त्यांचा मुलीच्या लग्न सोहळ्याची आजही चर्चा होते. 2013 मध्ये त्यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा पार पडला. मुलगी सृष्टीच्या हिच्या लग्नात मित्तल यांनी जवळपास 550 कोटी रुपये खर्च केले होते. जगभरात हा लग्न सोहळा चर्चेचा विषय बनला होता. दिवाळखोरीनंतर त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी ढासळली की दैनंदिन खर्चासाठी त्यांना कुटुंबावर अवलंबून राहावं लागलं. त्यांच्यावर 130 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त कर्ज होते. दिल्लीत त्यांची केवळ 45 पौंड संपत्ती शिल्लक होती.
मित्तल हे दिवाळखोर कसे बनले याची कहाणी जीआयकेआयएल या बोस्नियाच्या कोक कंपनीशी जोडलेली आहे. जीआयकेआयएलच्या कर्जाची हमी प्रमोद मित्तल यांनी घेतली होती. हीच चुक त्यांच्या दिवाळखोरीचं कारण ठरली. जीआयकेआयएल कर्ज फेडण्यात अपयशी ठरली. याचा फटका मित्तल यांना बसला. जीआयकेआयएल लंडनस्थित स्टील ट्रेडिंग कंपनीला पैसे देऊ शकली नाही, ज्याचे मित्तल गॅरंटर होते. जीआयकेआयएलसह मित्तल यांना दिवाळखोर घोषित करण्यात आलं. अखेर 2019 प्रमोद मित्तल आणि जीआयकेआयएलच्या इतर दोन अधिकाऱ्यांना बोस्नियातील फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अटक झाली तेव्हा मित्तल 60 वर्षांचे होते. यानंतर मित्तल यांचे काय झाले? सध्या ते कुठे आहेत? कोणत्या परिस्थितीत आहेत. याची काहीच माहिती समोर आलेली नाही.