Eknath Shinde Ganesh Chaturthi 2023 : देशासह परदेशातही गणेशोत्सवाची धूम सुरु झाली असून, आता सर्वत्र बाप्पाच्या येण्यानं वातावरणात आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. अशा या वातावरणात काही गणेशभक्तांच्या खात्यात अमुक एक रक्कम जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वाहन विभागाशी या रकमेचा संबंध असून, त्या दृष्टीनं प्रयत्नही सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान टोल माफी देण्याचा निर्णय घेतला होता. पण, टोलनाक्यावर बसवलेल्या फास्टॅग स्कॅनरमधून वाहनचालकांची टोलची रक्कम आकारण्यात आली. किंबहुना अद्यापही ही रक्कम आकारणं सुरुच आहे.
शासनदरबारी झालेल्या निर्णयानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही हे पैसे कापले जात असल्यामुळं अनेक वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. ज्यानंतर फास्टॅगमधून कापण्यात आलेली रक्कम वाहनचालकांना परत मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
गणेशोत्सवासाठीचे पास असूनही खात्यातून पैसे कापले जात असल्याचा तीव्र नाराजीचा सूर वाहनचालकांनी आळवला आहे. किंबहुना सदर प्रकरणी अनेक तक्रारी आल्यामुळं आता याबाबतचा तपशील परिवहन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार असून पुढील कारवाई पार पडेल. ज्यानंतर वाहनचालकांना त्यांची रक्कम फास्टॅग खात्यात परत मिळेल. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनीच यासंदर्भातील माहिती दिली.