तब्बल 33 वर्षांनंतर उलगडले पनवेलमधील 'त्या' हत्याकांडाचे गूढ, आरोपीला अटक

Crime News Today: पनवेलमध्ये 33 वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे. या आरोपीचे आत्ताचे वय 70 वर्षे आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 24, 2024, 08:03 AM IST
तब्बल 33 वर्षांनंतर उलगडले पनवेलमधील 'त्या' हत्याकांडाचे गूढ, आरोपीला अटक  title=
Panvel Crime News Today Panvel Navi Mumbai Police Solve Murder of Woman after 33 years

Crime News Today: पत्नीला जीवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन तिला जिवंत जाळून फरार झालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी 33 वर्षानंतर अटक केली आहे. बाबु गुडगीराम काळे (७०) असे या आरोपी पतीचे नाव आहे. 

आरोपीने 1991मध्ये पनवेलमध्ये असताना पत्नीला जिवंत जाळून पलायन केले होते. तेव्हा पासून फरार असलेला हा आरोपी 33 वर्षे पोलीसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी परभणी येथून त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याची 3 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 

या प्रकरणातील आरोपी बाबु काळे हा 1991 मध्ये पत्नीसह पनवेल मध्ये राहण्यास होता. त्यावेळी त्याचे पत्नीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणादरम्यान आरोपी बाबु काळे याने पत्नीवर रॉकेल टाकून तिला जाळले होते. गंभीररीत्या भाजलेल्या बाबुच्या पत्नीला सायन हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी बाबूच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून पनवेल शहर पोलिसांनी बाबु विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, उपचारादरम्यान बाबुच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर बाबु काळे हा फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बाबु विरोधात कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. 

पनवेलमध्ये महिलेची हत्या करून जबरी चोर

पनवेलमध्ये एका व्यक्तीने महिलेची गळा आवळून हत्या केल्याची घटना दोन महिने आधी समोर आली होती. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेची हत्या करुन अंगावरील सोन्याचे सगळे दागिने आणि मोबाईल घेऊन आरोपी पसार झाला होता. घटना निर्जनस्थळी घडल्याने तपासात अडचणी होत्या मात्र गुन्हे शाखा कक्ष दोन तर्फे परिसरातील मोबाईल वापराचा सखोल अभ्यास आणि अनेक संशयितांकडे विचारपूस करुन घटनेनंतर मध्यप्रदेशला गेलेल्या एका संशयित इसमाला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली. 

यावेळी आरोपी शरद साहूकडे चोरी झालेल्या मुद्देमालासंबंधी विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने मयत महिलेचा पाठलाग करत तिचा हात पकडला असता महिलेने विरोध केल्याने आरोपीने एका कपड्याने मयत महिलेचा गळा आवळला ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.