मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवणार असल्याचा घणाघात विखे पाटलांनी केलाय. अपक्षांना दोष देण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे शिवसेनेने पहावं, असंही विखे पाटलांनी म्हटलंय.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपच्या महाडिकांनी बाजी मारली. अपक्षांना सोबत ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं. त्यांच्या या राजकीय डावपेचामुळे शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करण्याची संधी सोडली नाही. महाविकासआघाडीकडे संख्याबळ असताना देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
'राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार हे माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत सुखी. मात्र सामान्य शिवसैनिकासह आमदार खासदार दुःखी आहेत. येणाऱ्या विधान परिषदेतही शिवसेनेची नामुष्की होणार. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं षडयंत्र पहावं. राष्ट्रवादी काँग्रेस पासून सावध रहाण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा खेळ करणारा पक्ष आहे.' असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.