झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे 'लाल आंखे' करा- आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिलाय. 

Updated: Jun 17, 2020, 12:11 PM IST
झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे 'लाल आंखे' करा- आव्हाड  title=

मुंबई : सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन यांच्या लष्करी चर्चा सुरु असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात अचानक हिंसक झडप घालण्यात आली. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत २० जवान शहीद झाले आहेत. यावरुन देशभरातील नेते आक्रमक झालेयत. झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे 'लाल आंखे' करा असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय. 

चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या तीन सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे असे आव्हाड यांनी ट्वीटरवर म्हटलंय. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे "लाल आंखे" करून पहायची वेळ आल्याचे आव्हाड म्हणाले.

राहुल गांधींचे प्रश्न 

आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली, असा थेट सवाल राहुल गांधी यांनी मोदींना विचारला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत.  पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? आता हे पुरे झाले आहे. लडाख येथे नेमके काय घडले आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. चीनने आपला भूभाग घेण्याची  हिंमत कशी केली, असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

चिंता व्यक्त 

अमेरिकेनंतर संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनदरम्यानच्या संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केलं आहे.