Political News : केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह मुंबईत सहकार परिषद घेणार आहेत. या सहकार परिषदेला अमित शाहांसोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ काही वेळच उपस्थित होते आणि त्यानंतर ते अधिवेशनातून निघून गेले होते. मात्र भुजबळ अमित शाह यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यानं त्यांची भाजपसोबतची जवळीक स्पष्टपणे वाढताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यामुळे अजित पवारांसोबत भुजबळांचा दुरावा वाढतोय आणि भाजपसोबत त्यांची जवळीक वाढतेय ही बाब आता दर्शनीय आहे.
राजकीय वर्तुळाय या भेटीगाठी आणि सर्व सत्रांचे अनेक अर्थ काढले जाताहेत, तर्कही लावले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात हे एका नव्या अध्यायाचे संकेत तर नाहीत, अशीही चर्चा सध्या सुरू झाली आहे. तेव्हा येत्या काळात नेमकी ही राजकीय समीकरणं जैसे थे राहतात की, 360 अंशांनी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अमित शाह हे शुक्रवारी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर ते मालेगावात जाणार असल्याची माहिती आहे.
गेल्या काही काळापासून छगन भुजबळ नाराज असल्याचं अजित पवार पक्षामध्ये अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अजित पर्व सुरु असल्यामुळं माझी सातत्यानं अवहेलना होते असा आरोप सातत्याने केला होता. सध्या छगन भुजबळ पवारांच्या पक्षामध्ये असूनही त्यांचा सक्रिय सहभाग स्पष्टपणे दिसत नसल्यानं भाजपशी त्यांची वाढती जवळीक अनेक चर्चांना वाचा फोडत आहे. अमित शाह यांच्याच निर्देशानंतर भुबळांनी नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवावी असं सांगण्यात आलं होतं पण उमेदवारी दिली जात नाही म्हणून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. आता मात्र ते पुन्हा अमित शाह यांना भेटणार असल्यामुळं या समस्येवर, मंत्रीपद आणि एकंदर तणावाच्या परिस्थितीवर या भेटीतून तोडगा निघतो का हे पाहणं महतत्वाचं ठरणार आहे.