'अजित पवारांचे 42 आमदार कसे आले?', विचारणाऱ्या राज ठाकरेंना मिटकरींचा टोला, म्हणाले 'पहाटे 5 पासून...'

Amol Mitkari on Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या निकालावर (Maharashtra Assembly Election Result) भाष्य केलं असून, आश्चर्य व्यक्त केलं आहे. अजित पवारांचा लोकसभा निवडणुकीत 1 खासदार आला, त्यांचे 42 आमदार येतात असं सांगत त्यांनी शंका उपस्थित केली.   

शिवराज यादव | Updated: Jan 30, 2025, 06:10 PM IST
'अजित पवारांचे 42 आमदार कसे आले?', विचारणाऱ्या राज ठाकरेंना मिटकरींचा टोला, म्हणाले 'पहाटे 5 पासून...' title=

Amol Mitkari on Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या निकालावर (Maharashtra Assembly Election Result) भाष्य केलं असून, आश्चर्य व्यक्त केलं आहे. राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात संबोधित करताना ते म्हणाले की, "भाजपाला 132 जागा मिळाल्या. त्यापूर्वी 105 आणि 2014 ला 122 जागा होत्या. अजित पवारांना 42 जागा? चार-पाच जागा येतील असं वाटत असताना 42 जागा कोणाचा तरी विश्वास बसेल का?". दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. "अजित पवारांप्रमाणे पहाटे 5 पासून त्यांनी कामाला लागलं पाहिजे. त्याशिवाय अजितदादा नावाचा विकासपुरुष त्यांना कळू शकणार नाही," असं ते उपहासात्मकपणे म्हणाले आहेत. 

'लोकांनी आपल्याला मतदान केलं, फक्त ते...'; विधानसभा निकालावरुन राज ठाकरेंनी सगळंच काढलं

 

"त्यांना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय असल्याने विधानसभेत स्वत:च्याच घरातील दारुण पराभवानंतरच्या दीड महिन्यांच्या कालावधीनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 42 जागा कशा आल्या हा धक्का त्यांना बसला आहे. आम्ही त्यांना सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा ज्याप्रकारे रात्रंदिवस काबाडकष्ट करतात, मेहनत घेतात; मग शेती असेल, कला असेल किंवा राजकारण असेल त्यात मेहनत 42 जाागंपर्यंत घेऊन आली आहे," असं प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी दिलं आहे. 

पुढे ते म्हणाले की, "आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं. अजित पवारांप्रमाणे पहाटे 5 पासून त्यांनी कामाला लागलं पाहिजे. त्याशिवाय अजितदादा नावाचा विकासपुरुष त्यांना कळू शकणार नाही". 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना राज ठाकरेंनी, "काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. इथे राजू पाटील बसले आहेत. 1400 लोकांच्या गावात राजू पाटलांना किती मतं पडली असतील? त्या गावातून राजू पाटलांना एकपण मत पडलं नाही. यापूर्वीच्या निवडणुकींमध्ये त्यांना त्यांच्या भावाला मतदान झालं होतं. संपूर्ण मतं 1400 मतं राजू पाटलांना पडायची त्यापैकी एकही मत पडत नाही. आपल्या मराठवाड्यातील नगरसेवकाला त्याच्या भागातून साडेपाच हजार मतदान आहे त्याच्या वॉर्डातून. आता विधानसभेला त्याला किती मतदान झालं अडीच हजार. 70 ते 80 हजार मतांनी निवडणून येणारे बाळासाहेब थोरात 10 हजार मतांनी पराभूत झाला," असं म्हणत हे सारं विश्वास बसण्यासारखं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. तसेच, "राज ठाकरेंचा पराभव झाल्याने ते असं बोलतात म्हणतील लोक. मी काय अख्खा महाराष्ट्र बोलतोय," असंही राज ठाकरे म्हणाले. 

तीन महिन्यात लोकांचं मत बदललं?

"जे निवडून आलेत त्यांनाही शॉक बसलाय. मला अनेकांचा फोन आले. भाजपाला 132 जागा मिळाल्या. त्यापूर्वी 105 आणि 2014 ला 122 जागा होत्या. अजित पवारांना 42 जागा? चार-पाच जागा येतील असं वाटत असताना 42 जागा कोणाचा तरी विश्वास बसेल का? अजित पवार, भुजबळ ज्यांच्या जीवावर राजकारण करतात त्या शरद पवारांना 10 जागा. कोणाला तरी विश्वास बसण्यासारखं आहे का?" असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. तसेच पुढे बोलताना, "लोकसभेला सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले. सर्वसाधारणपणे एक खासदार म्हणजे 6 आमदार असतात. त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार त्यांचे 10 आमदार येतात. अजित पवारांचा 1 खासदार आला त्याचे 42 आमदार येतात. तीन महिन्यात लोकांचं मत बदललं?" असं राज ठाकरे म्हणाले. 

आपल्याला लोकांनी मतदान केलेलं आहे

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यासमोर भाषण करताना, "या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाही. आपल्याला केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं," असं म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. "अशा निवडणुका लढवायच्या असतील तर न लढवलेल्या बऱ्या. कोणी विजयाचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो अशा गोष्टी होत असतात," असं राज ठाकरे म्हणाले.