नागपूरमध्ये ट्रॅव्हलर बस अन् बाईकचा अपघात... बस जळून खाक! एकाचा मृत्यू; पाहा धक्कादायक Video

Nagpur Bus Accident: रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या आगीच्या ज्वालांमध्ये जळत असलेल्या बसचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु करण्यात आली असून नेमकं घडलं काय याचा शोध घेतला जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 14, 2024, 10:50 AM IST
नागपूरमध्ये ट्रॅव्हलर बस अन् बाईकचा अपघात... बस जळून खाक! एकाचा मृत्यू; पाहा धक्कादायक Video title=
या बस अपघाचाचा व्हिडीओ समोर आला आहे

Nagpur Bus Accident: नागपूरमध्ये एका ट्रॅव्हलर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात नागपूर-सुरत महामार्गावरील काळसर गावाजवळ घडला आहे. या बसने नेमके किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती समोर आलेली नाही. मात्र अन्य प्रवासी वेळीच बसबाहेर पडल्याने ते सुखरुप असल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त बस जळगावकडून धुळ्याकडे जात असतानाच बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर बसला आग लागली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्ती या बसने प्रवास करत होती अशी माहिती समोर आली असून ही बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या अपघातामागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. बसला एक दुचाकी धडकल्याने संपूर्ण बस कशी काय जळून खाक झाली याबद्दल चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरु केली असून नेमकं काय घडलं? दुचाकी आणि बसचा अपघात कसा झाला? गाडीमध्ये अपघात झाल्यानंतर आवश्यक असणारी यंत्रणा होती का? मयत व्यक्ती कोण आहे? यासारख्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान या अपघातानंतर रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या आगेच्या ज्वालांमध्ये जळणाऱ्या बसचा व्हिडीओ समोर आला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

नेत्याच्या गाडीला अपघात

दरम्यान, नागपूरमध्येच बुधवारी काँग्रेस नेत्याच्या कारला अपघात झाला. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या वाहनाला बुधवारी रात्री नागपूर शहरातील ऑटोमोटीव्ह चौकावर अपघात झाला. नितीन राऊत प्रचार संपून त्यांच्या घराकडे जात असताना एका ट्रकने त्यांच्या चारचाकी वाहनाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक कारच्या दरवाजाजवळ बसली. मात्र सुदैवाने कारचालकाने प्रसंगावधान दाखवत नियंत्रण कायम ठेवल्याने कार पलटली नाही. कारला अचानक धडक बसल्याने कारमध्ये बसलेले नितीन राऊत आणि इतर सहकाऱ्यांना जोरदार धक्का बसला. मात्र या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

नितीन राऊत हेही या अपघातातून बचावले असून ते सुखरूप आहेत. अपघातानंतर राऊत यांच्या सहकाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत आहेत.