Bramohos Scientist : ब्रम्होस वैज्ञानिक निशांत अग्रवालला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रम्होस एयरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयातील काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवण्याच्या प्रकरणात निशांत अग्रवाल याला अटक करण्यात आली होती. तब्बल पाच वर्षानंतर वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला 8 ऑक्टोबर 2018ला अटक करण्यात आली होती. निशांत अग्रवाल वैज्ञानिक म्हणून नागपूर जिल्ह्यातील ब्राह्मोस एयरोस्पेस लिमिटेड या ब्रह्मोस मिसाइलच्या निर्मितीशी संबंधित कंपनीमध्ये कार्यरत होता.. आज जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप अग्रवालवर होता.
8 ऑक्टोबर 2018 रोजी यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तरीत्या नागपुरातील उज्वल नगर परिसरात निशांत अग्रवाल याच्या घरावर धाड टाकत त्यांना अटक केली होती. त्याच्या विरोधात शासकीय गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप होता. कार्यालयातील संगणकातील अत्यंत गोपनीय माहिती त्यांनी त्यांच्या घरातील संगणकात ठेवली होती. ती माहिती त्यांनी शत्रूला पुरवल्याचा संशय एटीएसला होता.
ब्रम्होस एअरोस्पेसच्या नागपूर शाखेत निशांत अग्रवाल अभियंता पदावर कार्यरत होता. प्रकल्पासंदर्भातली गोपनीय माहिती निशांतच्या खासगी संगणकावर मिळाली. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएस शाखेने त्याला 8 ऑक्टोबर 2018 रोजी युपी आणि महाराष्ट्र एटीएस ने संयुक्त कारवाई करत निशांत अग्रवालला अटक केली होती. त्याच प्रकरणी आज निशांत अग्रवालला दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ब्राम्होस क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणालीची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला निशांत अग्रवाल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याची पोस्ट सोशल मीडियावर हेतुपुरस्सर पसरवीत असल्याच्या आरोप करण्यात आला होता. या विरोधात नागपूरात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. बालरतन फुले या नावाच्या तसेच इतर काही फेसबुक अकाउंट वरून निशांत अग्रवाल हा संघाचा स्वयंसेवक असल्याची माहिती पसरवण्यात आली होती. याविरुद्ध महाल येथील मोहिते शाखेच्या स्वयंसेवकांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये या अकाउंट विरुद्ध तक्रार दाखल केली होती.