नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी हलचाली सुरु? 850000000000 रुपयांच्या...

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदिल मिळाला आहे.

Updated: Jan 13, 2025, 11:41 AM IST
नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी हलचाली सुरु? 850000000000 रुपयांच्या...  title=
Nagpur Goa Shaktipeeth Expressway will get green signal again from maharashtra government

Shaktipeeth Expressway: नागपूर ते गोवा बांधण्यात येणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी शक्तीपीठी माहामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदिल मिळाला आहे. महामार्ग बांधण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. सरकारच्या निर्देशानुसार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पहिले पाऊल उचलले आहे.

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा असा ८०५ किमीचा आणि अंदाजे ८५ हजार कोटी रुपये खर्चाचा शक्तिपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे. १२ जिल्ह्यांतून जाणाऱ्या हा महामार्गामुळे नागपूर ते गोवा अंतर २० ते २२ तासांऐवजी १० तासांत पार करता येणार आहे. हा महामार्ग झाला तर तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग असेल. तेव्हा असा हा महत्त्वाकांक्षी महामार्ग मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने ठोस पाऊल उचलून पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविला होता. त्या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होती. 

शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती. शेकडो एकर जमीन प्रभावीत होत असल्याने तो रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून विरोध वाढला होता. एमएसआरडीसीने पर्यावरणासंबंधीचा प्रस्तावही मागे घेतला होता. मात्र प्रकल्प कुठेही रद्द झाला नसून विरोधाच्या पार्श्वभूमीवर संरेखनात बदल करत हा प्रकल्प मार्गी लावला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

कोणत्या जिल्ह्यामंधून जाणार होता शक्तीपीठ महामार्ग ?

सहा पदरी असणारा हा महामार्ग राज्यातील वर्धा, , नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत.

कोणत्या  तीर्थक्षेत्रांना जोडणारा होता शक्तीपीठ महामार्ग?

शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा माहामार्द जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर , नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर , पट्टणकोडोली, कणेरी , आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार होता.