Monsoon Picnic Spot News In Marathi: पावसाळा सुरू होताच पर्यटनाचे बेत आखले जातात, तसेच पर्यटकांची पावले आपूसक धबधबे व धरण परिसरांकडे वळू लागतात. पावसाळा सुरू होताच कोकणातील धरणे, धबधबे पर्यटकांना फुलून जातात. अशातच शनिवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी जायला आवडतं, पण तुम्ही पावसाळ्या विकेंडला फिरण्याची स्पप्न पाहत असाल तर थांबा... कारण माणगाव पाठोपाठ कर्जतमधील पावसाळी पर्यटन स्थळांवर देखील निर्बंध घालण्यात आलेत.
गेल्या अनेक वर्षात पावसाळ्यात धरणाच्या जोरदार प्रवाहामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील धरणे आणि धबधबे हे पर्यटकांचे आकर्षक स्थळे आहेत. अशात, अवघ्या तासाभराच्य अंतरावर असलेले कर्जत, खालापूर परिसरातील झेनिथचा धबधबा, कर्जतजवळील आषाणे-कोसाणे, सोलनपाडा आणि पाली-भुतिवली धरण ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. केवळ गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वाचा : सोने स्वस्त तर चांदी चकाकली! पाहा काय आहे आजचा प्रति तोळा भाव
याशिवाय कर्जत परिसरात सुमारे 18 पर्यटनस्थळे आणि खालापूर हद्दीत 14 पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटक भेट देत असतात. दरम्यान या सर्व धबधबे, धरणे आणि तलावांच्या ठिकाणी पर्यटक येत असून काही ठिकाणी पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये या परिसरलगतच्या एक किलोमीटर परिसरात कलम 144 आणि इतर आदेश लागू करण्यात आले आहेत. येत्या 15 ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
धामणी कातकरवाडी तलाव, आडोशी धबधबा, मोरबे धरण, डोणवट धरण, मडप धबधभा, झेनिथ धबधभा, कलोते धरण या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा खालापूरमध्ये समावेश होतो. कर्जतमधील तार, खांडस धरणे, आषाणे-कोशणे धबधबा, साळोख धरणे, पाली-भुतिवली धरणे, जुमापट्टी धबधबा, पलासदरी धरण ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
याच पार्श्वभूमीवर माणगाव पाठोपाठ कर्जतमधील पावसाळी पर्यटन स्थळांवर देखील निर्बंध घालण्यात आलेत. सोलनपाडा, टपालवाडी, आनंदवाडी धबधबा, पाली भुतीवली यासह इतर ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलंय. याठिकाणी 1 किलोमीटर परिसरात दारू पिणं, खोल पाण्यात उतरणं यावर बंदी घालण्यात आलीये. प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी हे आदेश जारी केलेत. येत्या 15 ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.