Bacchu Kadu Punishment : माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना धाराशिव जिल्हा सञ न्यायालयाने अनोखी शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांच्याकडून 2500 रुपयांचा दंड देखील वसुल केला आहे. आंदोलन प्रकरणात पोलिसांसह हुज्जत घातल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, या प्रकरणातील इतर तिघांना कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना कोर्ट सुटेपर्यंत कोर्टात बसून राहाणे आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. धाराशिव जिल्हा सञ न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2015 मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बच्चू कडु आणि इतर तीन जणांच्या विरोधात धाराशिव शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणी आज धाराशिव जिल्हा सञ न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी या प्रकरणावर शिक्षा सुनावली. कलम 506 नुसार या प्रकरणात बच्चू कडू यांना दोषी ठरवण्यात आले. कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोर्टात बसुन राहाणे तसेच अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. या प्रकरणातील इतर तिघांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सन 2015 मध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करण्यात आले होते. दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला तीन टक्के निधी खर्च न करण्यात आल्यामुळे बच्चू कडू यांनी हे आंदोलन केले होते. यावेळी कडू यांच्यासह आंदोलक थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शिरले होते. यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कडू यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. तसेच कडू यांनी अर्वाच्य भाषेत पोलिसांना शिवीगाळ केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
यापूर्वी देखील अमरावतीच्या चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये न्यायालयाने हा निर्णय दिला होता. 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी संपत्तीबाबत माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती दडवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी हे आरोप करत कोर्टात धाव घेतली होती. यानंतर या प्रकरणाची तपासणी करत कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली.