पुणे : मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? असा परखड सवाल मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. 'मराठी भाषा मरेल हा टाहो किती दिवस फोडायचा? हिंदीत का बोलायचं? प्रत्येकानं मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.
पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीनं सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार वितरण सोहळा आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रात जेवढे संत झाले, महाराष्ट्रात जेवढे साहित्यिक झाले, महाराष्टात जितके कवी झाले, त्या प्रत्येकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस असला पाहिजे, असं परखड वक्तव्य राज ठाकरे यांनी यावेळी केलं.
27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचा कायम आग्रह धरणाऱ्या राज ठाकरे यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी आधी मराठीत बोलणं गरजेचं आहे, मराठी बोलताना लाज वाटायची गरज नाही असं मत व्यक्त केलं.
आपल्या मातृभाषेचा आग्रह आपणच धरला पाहिजे, तिचा अभिमान बाळगला पाहिजे. कोलकत्याला तिथल्या मंत्रालयात गेलो तेव्हा मला तिथे बंगाली भाषेतील किशोरदांची गाणी ऐकू आली. हा खरा भाषेचा सन्मान आहे असं सांगत राज ठाकरे यांनी मायमराठीच्या बाबतीत आपलं सरकार अशी पावलं का उचलत नाही असा सवालही विचारला.
हे संस्कार साहित्यिकांनी केले पाहिजेत, भाषा मरेल हा टाहो किती दिवस फोडत बसायचा. मराठी भाषा एकच दिवस का साजरा करायचा, का नाही 365 दिवस तो साजरा करायचा? असा परखड सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला. लेखकांनी नव्या पिढीवर संस्कार केले पाहिजेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
मास्कवरुन टोलेबाजी
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मास्क वापरण्यावरुन टोलेबाजी केली. मी कधी मास्क वापरलाच नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. खुर्च्यांवरील फुल्या आता खरंतर गेल्या पाहिजेत, काय काय पाहिलं आपण, घरातल्या घरात स्पर्श करायला तयार नव्हतो आपण कोरोना काळात, आता ते दिवस लवकर जाओत असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.