Video: अर्थमंत्री एक शब्दही बोलल्या नाहीत अन् विरोधकांचा सभात्याग; सभागृह सोडलं कारण...

Union Budget 2025 Updates Opposition Walked Out: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करण्याआधीच विरोधक सभागृहाबाहेर गेले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 1, 2025, 12:15 PM IST
Video: अर्थमंत्री एक शब्दही बोलल्या नाहीत अन् विरोधकांचा सभात्याग; सभागृह सोडलं कारण... title=
निर्मला यांनी भाषण सुरु करण्यापूर्वीच विरोधकांचा सभात्याग (फोटो - एएनआयवरुन साभार)

Union Budget 2025 Updates Opposition Walked Out: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज देशाचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेमध्ये उभ्या राहिल्या. मात्र त्यांनी अर्थसंकल्पासंदर्भात एक शब्दही उच्चारण्याआधीच विरोधकांनी आरडाओरड सुरु केला. अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होण्याआधीच विरोधकांनी कामकाज सोडून वॉक आऊट केलं. विरोधी पक्षातील सर्व खासदार सभागृह सोडून बाहेर निघून गेले. मात्र नेमकं हे वॉक आऊट का करण्यात आलं? यासंदर्भातील तपशील समोर आला आहे.

'हिंदू विरोधी मोदी सरकार' अशी घोषणाबाजी

निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आपल्या जागेवर उभ्या राहिल्या तेव्हा विरोधकांनी 'हिंदू विरोधी मोदी सरकार' अशा घोषणा देत गोंधळ सुरु केला. बराच वेळ घोषणाबाजी सुरु होती. निर्मला सीतारमण यांच्याकडून मूळ बजेट वाचनाला सुरुवात होण्याआधीच ही घोषणाबाजी सुरु झाली. उत्तर प्रदेशमधील महाकुंभ येथे झालेली चेंगराचेंगरी आणि त्यासंदर्भातील विषयांवर विरोधकांना आपलं म्हणणं मांडायचं होतं. मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नाही.

खासदार संसदेच्या वेलमध्ये उतरले अन्...

समाजवादी पक्षाचे खासदार लोकसभेच्या वेलमध्ये उतरले आणि त्यांनी बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी केली. सपाचे प्रमुख नेते तसेच खासदार अखिलेश यादव यांना संसदेमध्ये प्रयागराज येथील चेंगराचेंगरी आणि तेथील व्यवस्थेसंदर्भात सभागृहासमोर आपलं म्हणणं मांडायचं होतं. मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. यानंतर विरोधी पक्षातील सर्वच खासदार संसदेच्या सदनाबाहेर निघून गेले. मात्र काही मिनिटांमध्येच ते पुन्हा आपल्या आसनांवर येऊन बसले. विरोधकांचं हे वॉक आऊट प्रातिनिधिक होतं असं सांगण्यात आल्याची माहिती, एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

प्रयागराजला घडलं काय?

प्रयागराज येथे 27 तारखेला पहाटे अमृतस्थानाच्या वेळी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर चेंगराचेंगरीची घटना घडलेली. या घटनेनंतर पहाटेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोनवरुन संवाद साधला होता. नंतर राज्य सरकारला केंद्राकडून सर्व ती मदत केली जाईल असं पंतप्रधानांनी घोषित केलं होतं. रात्री उशीरा या चेंगराचेंगरीमध्ये 30 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक समिती स्थापन केली आहे. या समितीला सदर घटनेसंदर्भात एका महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.