Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस माझं एन्काऊंटर करण्याचा विचार करत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. यानंतर आपण सागर बंगल्यावर येत असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र आता पुन्हा मनोज जरांगे पाटील पुन्हा मागे फिरले आहेत. अंतरवली सराटीमध्ये जाऊन आपण निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे मुंबईकडे निघाल्यानंतर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मध्यरात्री 1 वाजल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली आहे. यासोबत मनोज जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यासह पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. याचा विरोध म्हणून घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बस जाळण्यात आली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवलीत जाण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी रात्री भांबेरी गावात तळ ठोकला होता. त्यानंतर भांबेरी गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवली सरावटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
"संचारबंदी लागू करण्यासाठी काय झालंय? आता आम्हाला जावू द्यायचं नाही. देवेंद्र फडणवीसांना यांच्या आडून लपायचं आहे का? देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीचा फोटो टाकला होता. हा प्रयोग ते रात्रीच करणार होते. सगळ्यांना एक विनंती आहे की पोलिसांना त्रास देऊ नका. आपल्याला माहिती आहे की त्यांच्यात दम नाही. ते पोलिसांच्या आडूनच करणार आहेत. एक ते दोन तासांत निर्णय घेऊ. मी त्यांच्याकडे बघणार आहे तुम्ही शांत राहा. संचारबंदी लावली तरी देवेंद्र फडणवीसांना सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार. याचा परिणाम सगळ्या जातीधर्मात होणार आहे. तुझ्याविषयी प्रचंड नाराजीची लाट उसळणार आहे. याचा एवढा पश्चाताप होणार आहे. आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. त्यामुळे आजच्याआज सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. कारण जिल्हाधिकारी तुमच्याशिवाय संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही. आपल्याला विचार करुन पुढचे पाऊल टाकावं लागणार आहे," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"महिलांना खरचटलं जरी असतं तर हे राज्य पेटलं असतं. देवेंद्र फडणवीस 100 टक्के महिलांवार हात उचलायला लावणार होते. पण मी आंदोलन चालवत आहे उगाच यशस्वी झालेलो नाही. तुझे डाव ओळखून आहे. आतापर्यंत घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले," असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.