'तू मराठ्यांचं रक्त पिऊन...'; 7 कोटींच्या खर्चाच्या दाव्यावरुन जरागेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal Mentioned Ajit Pawar: मनोज जरांगेंनी जाहीर सभेमध्ये बोलताना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत छगन भुजबळांना समज देण्याचं आवाहन केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2023, 01:26 PM IST
'तू मराठ्यांचं रक्त पिऊन...'; 7 कोटींच्या खर्चाच्या दाव्यावरुन जरागेंचा भुजबळांवर हल्लाबोल title=
जाहीर सभेमध्ये बोलताना जरांगेंनी साधला निशाणा

Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal Mentioned Ajit Pawar: मनोज जरांगेच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनासाठी पैसा कुठून येतो असा प्रश्न राज्यातील मंत्री आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. याच प्रश्नाला जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर सभेमधून उत्तर दिलं आहे. थेट छगन भुजबळांच्या नावाचा उल्लेख न करता अगदी आपल्या गावरान शैलीत मनोज जरांगेंनी टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातील नेत्याला समज द्यावी असंही जरांगे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

मराठ्यांची लेकरं आरक्षणापासून वंचित राहता कामा नये

केंद्र आणि राज्य सरकारला मनोज जरांगेंनी इशारा दिला. "केंद्र आणि राज्याला मी सांगतो हे मराठ्यांचं आग्यामोहळ शांत आहे. एकदा का हे आग्यामोहळ उठलं तर आरक्षण घेतल्याशिवाय ते राहणार नाहीत.  राज्य आणि केंद्रालाही विनंती आहे. हा गोरगरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करुन देशाला अन्नधान्य पुरवतो. त्याची लेकरं आरक्षणापासून वंचित राहता कामा नये. माझंही लेकरु नोकरीला लागलं पाहिजे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं. सरकारने तातडीने मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत," असं जरांगे म्हणाले.

'आरं काय वावरं घेतलं का आम्ही येडपटा?'

पुढे बोलताना जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनासाठी केल्या जाणाऱ्या खर्चावरुन उपस्थित होत असलेल्या प्रश्नाला कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं. छगन भुजबळ यांनी आज होत असलेल्या सभेसाठी 7 कोटी खर्च आल्याचा संदर्भ देत जरांगेंनी शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला. "आता नवा एक फॉर्म्युला आला आहे. त्याला बोलत नव्हतो बरं का मी. त्यो एक दिवस म्हणाला, आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही. माझ्या एकट्याच्याच मागे लागले. मराठा आरक्षणाला विरोध नाही म्हटल्यावर आपण बोलायला बंद केलं. काल पुन्हा फडफडायला लागलं. काल म्हणतंय, 7 कोटी रुपये खर्च आला. आरं काय वावरं घेतलं का आम्ही येडपटा?" असं जरांगेंनी म्हणताच उपस्थितांनी प्रतिसाद दिला.

नक्की वाचा >> मनोज जरांगेंची फडणवीसांवर सडकून टीका! थेट मोदींना आवाहन करत म्हणाले, 'तुम्हाला 106 आमदार...'

"मराठ्यांचं रक्त पिऊन पैसे कमवला म्हणून धाड पडली"

छगन भुजबळांच्या कथित वक्तव्यांचा संदर्भ देत मनोज जरांगेंनी, "100 एकर विकत नाही घेतलं. हे सभेसाठी घेतलं आहे भाड्याने. इथल्या शेतकऱ्याने फुकट दिलं आहे. गाड्या माझ्या मराठ्याने स्वत: पदराने लावल्यात. त्यो म्हणतो लोकं 10 रुपये पण देत नसतील. अरं तुला देत नसतील. तुला लोक का देत नसतील पैसे ते पण सांगतो. ज्या गोरगरीब मराठ्यानं तुला मोठं केलं त्यांचेच रक्त पिऊन तू पैसा कमवला म्हणून तुझ्यावर धाड पडली. गोरगरीब जनतेचे पैसे खाल्ले आणि 2 वर्ष बेसन खाऊन आतून (तुरुंगातून) आला. आम्हाला शिकवतोय! हे पैसे कुठून आले?" असा प्रश्न विचारला. 

पैसे कसे जमा केले?

मनोज जरांगेंनी आंदोलनासाठी पैसे कसे गोळा केले हे सुद्धा सांगितलं. "माझा मायबाप मराठा काबाड कष्ट शेतात करतो. आम्ही घाम गाळतो. आमच्या घामातून आम्ही निधी गोळा केला आहे. गोदा पट्ट्यातील 123 गावांनी निधी गोळा केला आहे. कापूस विकलेले, घाम गाळून कमवलेले पैसे माझ्या मायबाप मराठ्याने 1000, 500 करुन जमा केलेत. महाराष्ट्रातून इथं आलेल्या मराठा समाजाची सेवा करण्याचं काम या 123 गावांनी केलं आहे. तुझ्यासारखं नाही आमचं," असं म्हणत छगन भुजबळांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली.

नक्की वाचा >> राजकारण्यांना घाम फोडणारे, लाख मराठ्यांना एकत्र करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

'33 गावांकडून घेतले पैसे, त्याला येडं लागलंय...'

महाराष्ट्रातला मराठा समाज आम्हाला निधी द्यायला तयार होता. मी मीडियासमोर हे सांगतोय. पण मी सांगितलं की 123 गावांना मराष्ट्रातील मराठा समाजाची सेवा करायची आहे. एक रुपया सुद्धा कोणी द्यायचा नाही. जर कोणी दिले असले तर तुमचे माघारी घ्या. दिले असतील तर आम्ही मागितलेले नाही. आम्ही केवळ 33 गावांकडून घेतले आहेत पैसे. पैसेच तितके जमा झाले. त्या 7 कोटीवाल्याला लगेच हिशोब घे म्हणाव. खर्च मराठ्यांना सांगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नाही सांगत. ते 7-8 वेळा जाऊन आलंय आत. 123 गावातून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिले. तेच एकूण 21 लाख जमा झाले. आपल्याकडे अजून 101 गावं आहेत. त्यांच्याकडे पैसे जमा असूनही घेतले नाहीत कारण हे आंदोलन पैशासाठी नाही न्यायासाठी आहे. त्याला वावार घ्यायचं लागलंय येड. ते घेतंय वावरं. पैसे खातंय जनतेचे. त्यामुळे त्याला वाटलं आपण ही 170 एकरात सभा घेतली तर हे वावरं विकत घेतलं,"

अजित पवारांना म्हणाले, त्यांना समज द्या

अजित पवारांचा उल्लेख करत जरांगेंनी छगन भुजबळांना उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी असंही म्हटलं. "ते म्हणतंय 7 कोटी खर्च आला. कोटीच पहिल्यांदा ऐकतोय आम्ही. आम्ही 20-20 रुपयांचं पेट्रोल टाकून मोटरसायकल चालवणारे. 7 कोटी केव्हा बघावं. काय म्हणावं एवढ्या मोठ्या नेत्याने त्याला समजलं पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुमच्या पक्षाचं आहे. समज द्या. नाहीतर मी असा मागं लागेन. माझ्या नादाला लागल्यावर मी सोडतच नाही," असं जरांगे म्हणाले.