Maharashtra Weather News : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यावर आलेलं पावसाचं सावट पुन्हा एकदा नाहीसं होऊन लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. एकिकडे राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र गारठा वाढत असल्यानं राज्यातून अद्यापही थंडीनं काढता पाय घेतलेला नाही हेच आता स्पष्ट होत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत असली तरीही पुढील 24 तासांमध्ये त्यात आणखी घट अपेक्षित असल्याचा इशारा देणअयात आला आहे. सातत्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं राज्यात पुन्हा एकदा थंडी काहीशी सक्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरीही तापमानातील चढ- उतार मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्येही धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तर, विदर्भात काही अंशी पहाटेच्या वेळी बोचरी थंडी जाणवत आहे.
मराठवाड्यातही चित्र फारसं वेगळं नाही. कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, किमान तापमानात पुढील 24 तासांमध्ये 2 ते 3 अंशांची घट अपेक्षित आहे. असं असलं तरीही 24 तासांचं चक्र ओलांडल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदलांचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारनंतर तापमानवाढीस सुरुवात होणार आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा उष्मा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगर, औरंगाबाद, पुणे इथं किमान तापमान 14 ते 17 अंशांदरम्यान असलं तरीही कमाल तापमानाचा आकडा सरासरी 34 अंशांदरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे.
पंजाब आणि नजीकच्या भागांमध्ये चक्राकार वारे सक्रिय असल्यामुळं राजस्थानासह मध्य भारतापर्यंत याचे परिणाम दिसून येत आहेत. वायव्य भारतातून 150 नॉट्स इतक्या वेगानं वाऱ्याचे जोरदार झोत वाहत असल्यामुळं राज्यातील तापमानात यामुळं चढ- उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं ध्यानीमनी नसणारं हवामान राज्यात सध्या पाहायला मिळतंय असं म्हणणं गैर ठरणार नाही.
देश स्तरावर हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, काश्मीरचं खोरं, हिमाचल प्रदेश, येथील पर्वतीय भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट कायम राहणार असून, बर्फवृष्टीमुळं मैदानी भागांमध्ये थंडीचा मारा कायम असेल.