महाराष्ट्रात हिवसाळा... पुणे तापलं तर मुंबईत पुन्हा गारठा; काय करावं कळेना

नेमकं चाललंय काय? कुठे गारवा तर कुठे कडक उन्हाळा; महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांत कसं असेल तापमान

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 13, 2025, 07:19 AM IST
महाराष्ट्रात हिवसाळा... पुणे तापलं तर मुंबईत पुन्हा गारठा; काय करावं कळेना title=

Maharashtra Weather Update : नेमकं चाललंय काय? कुठे गारवा तर कुठे कडक उन्हाळा; महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांत कसं असेल तापमान

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या तापमानात मोठा बदल झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर आलं असताना राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात मोठा बदल झाल्याच दिसत आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहेत. तर काही ठिकाणी गार वाऱ्याची झुळूक अनुभवता येत आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील वातावरण कसं असेल? 

मुंबईत कसं वातावरण?

मुंबईमध्ये कुलाबा येथे 22.6 तर सांताक्रूझ येथे 20.1अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे 2.6 आणि 2.4 अंशांनी अधिक होते. दिवसभरात वातावरणात कुलाबा येथे आर्द्रता अधिक होती तर सांताक्रूझ येथे मात्र 40 टक्क्यांहून कमी होती. कुलाबा येथे कमाल तापमानाचा पारा 31 अंश सेल्सिअस नोंदला गेला. कुलाबा येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा 1.1 अंश सेल्सिअस अधिक होते.

पुण्यात पारा वाढला?

मुंबईत गारवा असला तरीही पुण्यात मात्र तापमान वाढलं आहे. पुण्याचा पारा 34 डिग्री सेल्सियसवर पोहोचलं आहे. पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यामध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे कुठे गारवा तर कुठे उष्णता असं सध्याचं महाराष्ट्रातील तापमान असल्याचं सांगण्यात येत आहे. 

वातावरणात एवढा बदल का?

 वाऱ्यांची दिशा गेल्या दोन आठवड्यांपासून सतत बदलत आहे. वाऱ्यांचे अस्थिर वहन महाराष्ट्रावर (Maharashtra) टिकून असल्यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अटकाव होत आहे. वातावरणाला दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. जसे की, महाराष्ट्रावर हवेचा उच्च दाब तसेच प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेकडील थंड वारे अडवले जात आहेत.

सध्याचा वाऱ्यांच्या वहनाचा पॅटर्न बदलत नाही, तोपर्यंत थंडीची शक्यता कमी आहे. जोपर्यंत उत्तरेकडून थंडीला पोषक वारे वाहत नाहीत, तोपर्यंत थंडी वाढणार नाही. 28 जिल्ह्यांमध्ये वातावरणात कोणताही मोठा बदल संभवत नाही.