रात्री 12.50 ला झालेल्या कार अपघाताबद्दल Urmila Kothare चा धक्कादायक आरोप! म्हणाली, 'मुंबई पोलीस खासगी..'

Urmila Kothare Car Accident: भरधाव वेगातील कारने दोन मजुरांना उडवलं होतं. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण जखमी झालेला. या प्रकरणात आता अभिनेत्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 13, 2025, 11:53 AM IST
रात्री 12.50 ला झालेल्या कार अपघाताबद्दल Urmila Kothare चा धक्कादायक आरोप! म्हणाली, 'मुंबई पोलीस खासगी..' title=
उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

Urmila Kothare Car Accident: अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारला झालेल्या अपघात प्रकरणामध्ये तिने आता थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. अपघाताचा तपास सीआडी किंवा अन्य तपासयंत्रणेकडे देण्याची मागणी या अभिनेत्रीने केली आहे. उर्मिला दाखल केलेल्या याचिकेमध्ये तिने मुंबई पोलिस तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणामधील सीसीटीव्ही फुटेज देत नसल्याचं अभिनेत्रीने याचिकेमधून म्हटलं आहे. 

अपघात कुठे झाला?

27 डिसेंबर रोजी मुंबईतील कांदिवलीमधील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ उर्मिलाच्या कारचा भीषण अपघात झाला. उर्मिलाच्या गाडीने दोन मुजरांना उडवलं. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. तसंच या अपघातात उर्मिला स्वतः आणि चालक जखमी झाले होते. त्यामुळे तातडीने जमखींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, या भीषण अपघाताप्रकरणी उर्मिलाचे कारचालक गजानन पाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटकही करण्यात आली. 

मैत्रिणीला सोडून घरी जात होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 12 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास झाला. उर्मिला आपल्या मैत्रिणीला भेटून घरी परतत असताना हा अपघात झाला. याआधी मागे सीटवर बसलेल्या मैत्रिणीला जोगेश्वरी येथे उर्मिलाने सोडले. त्यानंतर ठाणे-घोडबंदर मार्गे घरी जात असताना कांदिवलीतील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ चालक गजानन पालचे गाडीवरचे नियंत्रण सुटले.

नक्की अपघाताच्या वेळी घडलं काय?

पोलीस चौकशीदरम्यान, एका वाहन चालकाने भरधाव वेगात येऊन गाडीला ओव्हरटेक केला. त्यामुळे त्या गाडीला धडकू नये म्हणून उर्मिलाचा चालक प्रयत्न करत असतानाच गाडीवरचा ताबा सुटला आणि ती उलटली. त्यानंतर गाडी एका बॅरिकेडला आदळली. त्यामुळे पुढे जाऊन गाडीने मेट्रो स्थानकाजवळ काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं, असं उर्मिला आणि तिच्या चालकने सांगितलं. सदर अपघातामध्ये मरण पावलेल्या मजुराचं नाव सम्राटदास जितेंद्र असं असून असून सुजन रविदास नावाचा कामगार जखमी झाला आहे. उर्मिला कोठारेच्या गाडी अपघाताप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता नव्या याचिकेत उर्मिलाचं म्हणणं काय?

मुंबई पोलीस या प्रकरणामध्ये मुंबईतील एका खासगी कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप उर्मिलाने नव्याने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. ज्या ठिकाणी आपल्या कारचा अपघात झाला तिथे मेट्रोच्या कामामुळे रस्ता खोदलेला होता. या ठिकाणी कोणतेही योग्य दिशादर्शक फलकही लावलेले नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.