Maharashtra Weather News : राज्यावर सूर्यदेवाचा प्रकोप सुरु असून दिवसागणित त्यामुळं जाणवणारा उकाडा आणखी वाढतच चालला आहे. किंबहुना या आठवड्याचा शेवटही उकाड्यानंच होणार असल्याचा इशारा हवामान विभागान दिला आहे. राज्यात सध्या विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी तापमानानं 35 अंशांची मर्यादा ओलांडली असून, बुधवारी अकोल्यामध्ये राज्यातील नव्हे, देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. इथं पारा 42.8 अंशांवर पोहोचला होता. तापमानाचा हा आकडा पुढील दोन दिवसांपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
तिथं विदर्भातील काही भागांवर पावसाचं सावट असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला खरा, पण इथं उकाड्यानंच नागरिक अधिक हैराण होताना दिसले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस तापमानवाढ कायम राहणार आहे. यादरम्यान दिवसाप्रमाणंच रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन उकाड्याची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवणार असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिला.
सध्या कर्नाटकापासून विदर्भाच्या पूर्वेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर केरळच्या किनारपट्टी भागामध्ये चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं विदर्भाच्या पूर्व भागामधील तापमानात चढ- उतार होत असून, इथं अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात सध्या अवकाळीचं सावटही दूर झालं असून सर्वत्र उन्हाच्याच झळा सोसाव्या लागत आहेत. सध्याच्या घडीला परभणी, वर्धा, अमरावती, बीड, बुलडाणा, यवतमाळमध्ये तापमानाचा आकडा 40 अंशांच्या पलीकडे गेला आहे. तर, अकोल्यासह वाशिम आणि मालेगावात तापमान 41 अंशांहून जास्त असल्याचं लक्षात येत आहे.
पुढील 3 दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्री उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे.तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5… भेट द्यI pic.twitter.com/fN2irBwAbN
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 27, 2024
पुणे 38.9 अंश सेल्सिअस
धुळे 39.5 अंश सेल्सिअस
जळगाव 40.8 अंश सेल्सिअस
कोल्हापूर 38.2 अंश सेल्सिअस
महाबळेश्वर 33.3 अंश सेल्सिअस
नाशिक 38.3 अंश सेल्सिअस
निफाड 37.8 अंश सेल्सिअस
सातारा 38.9 अंश सेल्सिअस
रत्नागिरी 32.2 अंश सेल्सिअस
छत्रपती संभाजी नगर 39.5 अंश सेल्सिअस
नागपूर 39 अंश सेल्सिअस