'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे

Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...   

सायली पाटील | Updated: Nov 13, 2024, 09:07 AM IST
'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे  title=
Maharashtra vishansabha ncp sharadchandra pawar party Supriya Sule On Devendra Fadnavis

Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आले असून, त्यावरून आता राजकारण अधिकच धुमसताना दिसत आहे. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली आहे. 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फाईल का दाखवली,? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी आपण फडणवीसांवर केस करणार असल्याचं वक्तव्य करत त्यांना थेट इशाराच दिला. आपण फक्त निवडणूक संपण्याची वाट पाहत असून, त्यानंतर फडणवीसांवर केस करणार असल्याचा इशारा देत त्यांनी जाहीर माफी मागावी अशी थेट मागणीच सुप्रिया सुळे यांनी केली. 

नेमकं प्रकरण काय? 

फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. किंबहुना अजित पवार यांना फाईल दाखवल्याचं अजित पवार स्वत: भाषणात म्हणाले, पण अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांनी फाईल दाखवलीच कशी? असा संतप्त सूर आळवत निवडणूक संपताच आपण फडणवीसांवर केस करणार असल्याचा थेट इशारा सुळेंनी देत पदभार स्वीकारताना घेतलेल्या शपथीचं स्मरण त्यांनी फडणवीसांना करून दिलं. 

हेसुद्धा वाचा : 'बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? अरे माझी बॅग...'; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

आपण जेव्हा पद आणि गोपनीयतेची शपथ घेतो, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतो तेव्हा फाईल्स दाखवण्याचा अधिकार कोणाकडेच नसतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही केस करता त्या व्यक्तीला बोलवून फाईल दाखवल्या जातात हे कितपत योग्य आहे? असा खडा सवाल करत फडणवीसांना राज्याला उत्तर द्यावंच लागेल असं परखड वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. 

फडणवीसांचं कृत्य म्हणजे संविधानाचा अपमान, असंच सर्वांचं मत असून, त्यामुळं आता त्यांनी यासंदर्भातील स्पष्टीकरण देणं अपेक्षित असल्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. सिंचन घोटाळ्याच्या फाईल प्रकरणावरून फडणवीसांना निशाण्यावर धरण्याची सुळेंची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा त्यांनी काही प्रसंगांचे संदर्भ मांडत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या फडणवीसांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले होते.