Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या पक्षापक्षांमध्ये असणारे मतभेद चव्हाट्यावर येत असून, कुटुंबांमध्ये पडलेली फूट राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी वाव देताना दिसत आहे. श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांना बारामतीतून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षानं विधानसभेचं तिकीट दिलं.
युगेंद्र यांच्या प्रचारार्थ खुद्द शरद पवार यांच्यापासून सुप्रिया सुळे आणि आता त्यांच्या मातोश्री प्रतिभा पवारही सक्रिय सहबाग घेताना दिसत आहेत. पण, त्यांची ही भूमिका अजित पवारांना मात्र काहीशी रुचलेली नाही. बारामतीतच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली.
युगेंद्र पवारांसाठी मैदानात उतरलेल्या प्रतिभा पवारांवर अजित पवारांनी निशाणा साधला. 'आतापर्यंत कधी प्रतिभा काकी बाहेर आल्या का? आताच का नातवाचा पुळका आलाय?' अशा शब्दांत अजित पवारांनी प्रतिभा पवारांना टोला लगावला. 'मी काय खताडा पिताडा आहे का? मी बारामती तालुक्याची वाट लावली का?', असा सवालही अजित पवारांनी केला. 'एवढा पुळका का होता? हे निवडणूक संपल्यानंतर काकींना विचारणार', असल्याचं अजित पवार म्हणाले.
शरद पवारांपेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त काम झालीत, असा दावाही बारामतीच्या गावदौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी केला. इथं नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी पवारांपेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त कामं झाल्याचा दावा केला. मात्र, 'शरद पवारांसोबत तुलना करतो त्यामुळे सगळीकडूनच अडचण होते', अशी कबुलीही अजित पावारांनी दिली.
लोकसभेच्या वेळी झालेल्या मतदानाविषयी वक्तव्य करताना तो तुमचा अधिकार होता जो तुम्ही पार पाडला, पण विधानसभेच्या निमित्तानं आपल्याला बरीच कामं करायचीयेत, पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय. लोकसभेला तुम्ही थोडी गंमत केली. आता मात्र तुम्ही विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल. मी खोटं नाही सांगतं, असं भावनिक आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलं.