मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन जीवनापासून ते अगदी शिक्षण व्यवलस्थेवरही याचे थेट परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांहून अधिक काळासाठी लागू करण्यात आलेल्या लॉ़कडाऊनला बऱ्याच अंशी शिथिलता मिळालेली असताना आता अनेकांच्या विशेष म्हणजे विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा शैक्षणिक क्षेत्राकडे लागल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे अपेक्षेनं पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
अर्थात त्यामागचं कारणंही तसंच आहे. मागील वर्षी याच दिवशी माद्यमिक शालांत परीक्षांचे निकाल शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. पण, यंदाच्या वर्षी अद्यापही निकाल जाहीर होण्याबाबतचे असंख्य प्रश्न अनुत्तरितच आहेत.
सोशल मीडियावर अनेक ठिकाणी निकालाच्या ताऱखांची चर्चा झाली, काही तारखा निश्चित झाल्याचंही म्हटलं गेलं. पण, या सर्व चर्चा तथ्यहिन असल्याची अधिकृत माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.
अद्यापही शिक्षण मंडळाकडून SSC दहावी आणि HSC बारावीच्या उत्तर पत्रिकांचं आणि निकालांचं काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळं येत्या काळात निकालांच्या तारखा या शिक्षण मंडळाकडूनच अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पाहा : कौतुकास्पद! गर्भवती हरिणीला वाचवण्यासाठी जवानाची नदीत उडी
किमान सध्याच्या घडीला अंतिम निकालांच्या कोणत्याही तारखेची निश्चिती करण्यात आलेली नाही. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही प्रकारच्या फसव्या आणि खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन शिक्षण मंडळातर्फे करण्यात येत आहे.
मागील वर्षी एव्हाना दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले होते. परिणामी विद्यार्थी त्याच्या करिअरच्या वाटांवर निघाले होते. पण, यंदा मात्र कोरोना व्हायरसमुळं या वैश्विक महारमारीचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे.