"आता मतदारांनीच खडसावून सांगितले पाहिजे, ‘हिंदू-मुसलमान आम्ही बघून घेऊ, तुम्ही..."; ठाकरेंची अपेक्षा

Maharashtra Assembly Election: "एरव्ही 60 ते 80 रुपये किलो या दराने मिळणारा लसूण आज 600 रुपयांवर पोहोचला आहे. पाव किलो लसणासाठी तब्बल 150 रुपये मोजावे लागत आहेत," असा उल्लेखही ठाकरेंच्या पक्षाने केलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 14, 2024, 06:58 AM IST
"आता मतदारांनीच खडसावून सांगितले पाहिजे, ‘हिंदू-मुसलमान आम्ही बघून घेऊ, तुम्ही..."; ठाकरेंची अपेक्षा title=
उद्धव ठाकरेंच्या पक्षाने साधला मोदींवर निशाणा

Maharashtra Assembly Election: "महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच देशातील महागाई रिझर्व्ह बँकेच्या हाताबाहेर गेल्याची बातमी समोर आली आहे. महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबरमध्ये 5.49 टक्के असलेला महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 6.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईची ही गेल्या 14 महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. पुन्हा ही ताजी आकडेवारी सरकारच्याच राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात महागाईचा भडका उडाल्याचे वास्तव जगजाहीर केल्याबद्दल राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून या खात्यातील अधिकाऱ्यांना आता सरकारने काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवू नये म्हणजे झाले," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. "निवडणूक प्रचारातून जनतेचे प्रश्न व जिव्हाळ्याचे मुद्दे बाद व्हावेत याकडे भारतीय जनता पक्षाचा सदैव कल असतो. त्यामुळेच मूळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भलतेच विषय प्रचारात आणण्याचे ‘दिशाभूल तंत्रज्ञान’ सरकार पक्षाने गेल्या 10 वर्षांत विकसित केले. प्रत्येक घरात भेडसावणाऱ्या महागाईच्या गंभीर विषयावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक उन्माद आणि जातीय विद्वेषाच्या नको त्या विषयांत जनतेला गुंगवून ठेवण्याचा खेळ राज्यकर्ते गेली काही वर्षे खेळत आहेत," असा आरोप ठाकरेंच्या पक्षाने 'सामना'मधून केला आहे.

जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय प्रचारात येता कामा नये

"विद्यमान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा घडू नये, यासाठी राज्यकर्त्यांनी जनतेला पुन्हा एकदा गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मतदानाला जेमतेम सहा दिवस शिल्लक आहेत; पण प्रचारातून महागाईचा मुद्दा शिताफीने दूर ठेवला गेला आहे. निवडणुकीच्या अंतिम आठवड्यात व त्याआधीही प्रचाराच्या रणसंग्रामात तोफा तर उदंड डागल्या गेल्या. तथापि, या प्रचारात जनतेचे मुद्दे मात्र कुठेच दिसत नाहीत. किंबहुना जनतेचे प्रश्न, जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय प्रचारात येता कामा नये, याची विशेष खबरदारी सरकार पक्ष घेत आहे. सत्तारूढ पक्ष देशातील वाढत्या बेरोजगारीवर बोलायला तयार नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बेरोजगारीच्या दराने गेल्या 10 वर्षांत उच्चांक गाठला. त्यावर सत्तारूढ पक्षाचे प्रवक्ते अवाक्षरही काढत नाहीत. शेतमालाचा उत्पादनाचा खर्च गेल्या 10 वर्षांत दुपटीहून अधिक वाढला आणि शेतमालाचे भाव मात्र आजही दहा वर्षांपूर्वी होते तेच आहेत. कवडीमोल भाव आणि एकूणच नुकसानीतील शेती यामुळे महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. त्यावरही सत्तारूढ पक्ष निवडणूक प्रचारात एक शब्दही बोलत नाही," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘बहोत हो गई महंगाई की मार’ अशी घोषणा देऊन 10 वर्षांपूर्वी...

"महागाईचा तर देशभरात आगडोंबच उसळला आहे. अन्नधान्य, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, बियाणे, खते, डाळी, पीठ-मीठ, चहा-साखर आणि आता तर भाजीपाल्याचे भावही गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांकडून स्वस्तात विकत घेतला जाणारा कांदा बाजारात दुपटीहून अधिक दराने विकून नफेखोरी सुरू आहे. रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या लसणाला तर सोन्याचा भाव आला आहे. एरव्ही 60 ते 80 रुपये किलो या दराने मिळणारा लसूण आज 600 रुपयांवर पोहोचला आहे. पाव किलो लसणासाठी तब्बल 150 रुपये मोजावे लागत आहेत. इतर भाजीपाल्यांच्या दरांचीही हीच अवस्था आहे. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेल्याने महिला वर्गाचे स्वयंपाकघराचे बजेट पार कोलमडून गेले आहे. ‘बहोत हो गई महंगाई की मार’ अशी घोषणा देऊन 10 वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने महागाईच्या विळख्यातून जनतेची सुटका तर केली नाहीच; उलट महागाई दुपटीने वाढवून ठेवली," असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.

राज्यकर्ते आज महागाईचा ‘म’ म्हणायलाही तयार नाहीत

"राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेली महागाईची ताजी आकडेवारी चिंताजनक आहे. अथक प्रयत्नांनंतरही नवनवीन विक्रम स्थापन करणारी महागाई रिझर्व्ह बँकेच्या हाताबाहेर गेली आहे. देशातील किरकोळ महागाईच्या दराने 14 महिन्यांचा उच्चांक गाठला. सर्व जीवनावश्यक वस्तू व खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किंमतींनी सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मात्र महागाईविरुद्ध बोंबा ठोकून सत्तेत आलेले राज्यकर्ते आज महागाईचा ‘म’ म्हणायलाही तयार नाहीत. महागाईऐवजी हिंदू, मुसलमान, निजाम, औरंगजेब, ‘बटेंगे ते कटेंगे’, ‘एक रहो, सेफ रहो’ अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा व उन्मादी विषय निवडणुकीत आणून भाजपने प्रचाराचा स्तर पार नासवून टाकला आहे. प्रचारासाठी गावात किंवा दारात येणाऱ्या सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांना आता मतदारांनीच खडसावून सांगितले पाहिजे, ‘हिंदू-मुसलमान आम्ही बघून घेऊ, तुम्ही महागाई कधी कमी करणार ते बोला!’ असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.