Raj Thackeray Big Announcment Ahead of MNS Manifesto: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये राज यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधीच राज ठाकरेंनी मनसैनिकांना मोठा धक्का दिला आहे. निवडणूक प्रचार संपण्याआधी राज ठाकरेंनी एक मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरेंनी सध्याची स्थिती पाहता हा निर्णय घेत असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं आहे.
"माझी 17 तारखेची सभा आहे म्हणताना ती होती म्हणावी लागेल. अजूनही सरकारकडून ज्या प्रकराची परवानगी लागते ती आलेली नाही. केवळ दीड दिवसांचा वेळ माझ्याकडे आहे. इतर सभाही करणं हे सारं कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे 17 तारखेची सभा आम्ही करत नाही आहोत," अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. या सभेला पर्यायी काय नियोजन आहे याबद्दल राज ठाकरेंनी माहिती दिली. "या सभेऐवजी मी मुंबई, ठाणे या सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे. सकाळपासून होईल सुरु आणि तो संध्याकाळपर्यंत सुरु असेल," असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंची तोफ शिवाजीपार्कवरुन प्रचाराचा कालावधी संपण्याच्या काही तास आधीच धडधडणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये या सभेसंदर्भात फार उत्सुकता होती. मात्र आता सभा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
17 नोव्हेंबरलाच बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन असतो. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बाळासाहेबांचा स्मृतीदिन असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी होते. अशावेळेस या ठिकाणी सभा घेणं उचित ठरणार नाही अशी चर्चा दबक्या आवाज सुरु होती. स्मृतिदिन आणि मनसेची सभा एकाच दिवशी झाल्यास या ठिकाणी शिवसैनिक आणि मनसैनिक आमने-सामने येण्याची शक्यता होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही शिवाजीपार्कमधील सभेसाठी परवानगी मागताना यासंदर्भातील उल्लेख केला होता. शिवाजी पार्कच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची गर्दी होऊन त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत वाद होवू शकतो. त्यामुळं मैदान आपल्याला द्यावे असे पत्र ठाकरेंच्या पक्षाने पालिकेला दिले होते. परंतु पालिकेने फर्स्ट कम फर्स्ट बेसेसवर मनसेला शिवाजी पार्क मैदानात सभेची परवागनी दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र अद्याप परवानगी न मिळाल्याने आणि तयारीसाठी कमी वेळ असल्याचं कारण देत राज यांनी सभा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे.
नक्की वाचा >> Disha Salian Case: महायुतीची सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? थेट नाव घेत इशारा
"आज मी जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करु एवढं दिलं आहे. आमच्या जाहीरनाम्यात काय करु आणि कसं करु हे जाहरीनाम्यात लिहिलेलं आहे. सखोल जाहीरनामा वाचावा अशी विनंती आहे. मी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट घेऊन येईल असं सांगितलं होतं. 2006 ते 2014 दरम्यान मला हिणवलं गेलं आणि कुत्सित प्रश्न विचारले गेले पत्रकारपरिषदांमध्ये. 2014 ते 2024 दरम्यान मला ती ब्लू प्रिंट कोणी केली कशी केली विचारलं नाही त्याबद्दल धन्यवाद. त्या ब्लू प्रिंटमधील अनेक गोष्टी आम्ही या जाहीरनाम्यात आणल्यात कारण प्रश्न बदलेले नाहीत," असं राज ठाकरे म्हणाले.
मनसेच्या जाहीरनामा तुमच्यासमोर प्रसिद्ध करतोय. किती प्रती छापल्या आहेत हे त्यावर लिहावं लागतं, असा निवडणूक आयोगाचा नियम असल्याचं मला आताच कळलं. डिजीटलच्या युगात हे असं विचारणं हस्यास्पद आहे. डिजीटली पाठवल्यानंतर ते कसं मोजणार? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी खोचक टीका केली.