Maharashtra Assembly Election: कोल्हापुरात सोमवारी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली. मधुरीमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले. आपला संताप आणि नाराजी त्यांनी शाहू छत्रपतींसमोर बोलूनही दाखवली, दरम्यान आता महाविकास आघाडीने नाराज झाल्याने अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांना समर्थन जाहीर केलं आहे.
राजेश लाटकर काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. शाहू महाराज यांनी तशी घोषणा केली आहे. इंडिया आघाडीच्या एकत्रित बैठकीत हा निर्णय झाला. राजेश लाटकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. महाविकास आघाडीने तिकीट कापलेल्या उमेदवारालाच पुरस्कृत उमेदवार केलं आहे. मधुरीमाराजे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीमधून माघार घेतल्याने त्याजागी अपक्ष असलेल्या राजेश लाटकर यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांच्या उमेदवारीवरुन फार नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. पक्षातील वरिष्ठांनी राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि काँगेसची नाचक्की झाली.
विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यांच्या जागी काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. पण नंतर सूत्रं फिरली आणि पक्षातील वरिष्ठांनी प्रसाद लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मधुरीमाराजे यांनी एबी फॉर्म देण्यात आला होता. यानंतर त्यांनी अर्जदेखील दाखल केला. मात्र यामुळे राजेश लाटकर नाराज झाले होते आणि त्यांन अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आता तेच महाविकास आघाडीचे अधिकृ उमेदवार ठरले आहेत.
मधुरीमाराजे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील मात्र चांगलेच संतापलेले पहायला मिळालं. दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली? अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. जर लढायचे नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती. मी माझी ताकद दाखवली असती अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.
जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेऊन मधुरीमाराजे गेल्यानंतर दरवाजातच सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती यांना सांगितलं की, "हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. हे नाही चालणार. मग आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायला हवा होता. मला काही अडचण नव्हती. हे चुकीचं आहे महाराज. हे मला काही मान्य नाही. मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती".
दरवाजातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शाहू महाराजांच्या समर्थकांना म्हणाले, "हे अजिबात बरोबर नाही, तुम्ही जेवढ्यांनी आग लावली त्या सर्वांना सांगत आहे". तसंच बाहेर उभ्या समर्थकांना, "दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग, मी माझी ताकद दाखवली असती"स अशा शब्दांत सुनावलं आणि रागारागात निघून गेले.