Maharashtra Assembly Election: विधानसभेच्या प्रचाराची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर असून त्यापूर्वीचा शेवटचा रविवार हा प्रचाराचा ब्लॉकबस्टर रविवार ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीच्या प्रचारासाठी आज प्रचारसभा घेणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची सांगता सभा होणार आहे. (दिवसभरातील लाइव्ह अपडेट्स पाहा येथे क्लिक करुन) नेमकं कोण आणि कुठे आज सभा घेणार आहे पाहूयात...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी 5.30 वाजता होत आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाषणं या सभेत होणार आहेत. महाविकास आघाडीकडून 'महायुतीच सरकार चले जाव'चा इशारा दिला जाणार आहे.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वर्ध्यात आहेत. त्यांची पहिली सभा गडचिरोली शहरात सकाळी 11 वाजता होणार आहे. दुपारी अडीच वाजता काटोल येथे तर दुपारी तीन वाजता सावनेर येथे अमित शाहांची सभा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अक्कलकुवा येथे जाहीर सभा होणार आहे. तर सायंकाळी साक्री येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्या सभेला संबोधित करतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चार सभा घेणार आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे:
सकाळी 9 वाजता : प्रचार रॅली, एकात्मता नगर, जयताळा बाजार चौक, नागपूर (दक्षिण-पश्चिम नागपूर)
दुपारी 2.45 वाजता : जाहीर सभा, कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड, जिल्हा नाशिक (चांदवड विधानसभा)
दुपारी 4.30 वाजता : जाहीर सभा, अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान, नशिक (नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा)
सायं. 7.45 वाजता : जाहीर सभा, थोरात चौक इचलकरंजी (इचलकरंजी विधानसभा)
या शिवाय फडणवीस आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात रोड शोमध्ये सहभागी होतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी बारामती तालुक्यातील माळेगाव आणि पणदरे गावांचा दौरा करणार आहेत. त्यानंतर शिरूर हवेली येथे सकाळी 11 वाजता न्हावरेमध्ये जाहीर सभेला अजित पवार संबोधित करतील. सायंकाळी पाच वाजता अजित पवारांची फलटणमध्ये जाहीर सभा आहे.
सकाळी 11 वाजता पाटण येथे उध्दव ठाकरे यांची पक्षाचे उमेदवार हर्षल कदम यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली आहे.
शरद पवारांची सासवड येथे काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप, दौंड येथे रमेश थोरात आणि इंदापूर तालुक्यातील सणसर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. माढा विधानसभा प्रचारासाठी शरद पवार यांची टेंभुर्णी येथे दुपारी बारा वाजता सभा होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या आज मुंबईत 2 तर ठाण्यात 2 जाहीर सभा घेणार आहेत. त्यापूर्वी कर्जत-जामखेडमध्ये गडकरी यांची भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी सकाळी 11 वाजता सभा होणार आहे. हा रोहित पवारांचा मतदारसंघ आहे.
काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांचा आज नागपुरात रोड शो होणार आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपुरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी हा रोड-शो करणार आहे. दुपारी 2 ते 3.30 दरम्यान वाजता प्रियंका गांधी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत त्यानंतर मध्य नागपुरात गांधी गेट ते बडकस चौक असाही त्यांचा एक रोड शो होणार आहे.