गटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पना

Maharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्राच्या राजकाणातील सर्वात मोठी घडामोड, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सोपवण्यात आलेली गटनेतेपदाची जबाबदारी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद...   

सायली पाटील | Updated: Dec 4, 2024, 12:56 PM IST
गटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पना  title=
Maharashtra Assembly Election CM oath Ceremony Devendra Fadnavis first speech post elected as legislature party leader

Maharashtra CM Oath Ceremony : विधीमंडळ पक्ष बैठकीमध्ये भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या भेटीनंतर अखेर पक्षाच्या गटनेतेपदी एकमतानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला स्वीकृती देण्यात आली. ज्यानंतर शिष्टाचारानुसार प्रस्ताव आणि त्यानंतर अनुमोदन प्रक्रिया पार पडली. विधीमंडळाच्या सर्वात मोठ्या पक्षाच्या गटनेतेपदी फडणवीसांचं नाव घेताच तिथं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठीचं अधिकृत पत्रक समोर आलं, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा करण्यात आला आणि अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

गटनेतेपदाच्या अनुमोदनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील सभागृहात उपस्थितांना संबोधित करत मतदारांचे आभार मानले. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर फडणवीसांनी जाणीवपूर्वक प्रकाश टाकत आमदारांचं लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी केंद्रीय निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्याप्रती आभार व्यक्त करत उपस्थित सर्व आमदारांप्रतीही आभार व्यक्त केले. 

'आपण एकमताने विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली त्याबद्दल आभार मानतो', असं म्हणताना यावेळची निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक होती. या निवडणुकीचं विश्वेषण करायचं झाल्यास एक गोष्ट समोर ठेवली ती म्हणजे 'एक है तो सेफ है' आणि 'मोदी है तो मुमकिन है' याचाच पुनरुच्चार त्यांनी केला. 

'मोजींच्या नेतृत्त्वामध्ये विजयाची मालिका लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्रानं जो जनमताचा कौल दिला त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, हा अगदी त्याजोगा जनमताचा कौल आहे', असं फडणवीस म्हणाले.  

एकनाथ शिंदेंचं नाव घेत म्हणाले... 

'या संपूर्ण प्रक्रियेत आपल्यासोबत तन-मनानं असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मी मनापासून आभार मानतो. रामदास आठवले आणि मित्रपक्षांचेही आभार, हे वर्ष अतिशय महत्त्वाचं असून, आपण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली या संविधानाची 75 वर्षे पूर्ण होत असून, सर्वार्थानं हे वर्ष महत्त्वाचं आहे', असं फडणवीस म्हणाले.  

हा जबाबदारीचा जनादेश...

जनतेनं इतका मोठा जनादेश दिला आहे की, या जनादेशातून मी इतकंच म्हणेन की आनंद आहे आणि जबाबदारीसुद्धा वाढली आहे. जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश असल्याचं म्हणत फडणवीसांनी विशेषत: लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके युवा, लाडके शेतकरी या सर्वांनी समाजातील दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी या सर्वांनी दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागेल, याची कल्पना आमदारांना दिली. 

प्राथमिकता आणि काम

येत्या काळात आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करणं याकडे असेल असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता आणि सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपणा सर्वांना सतत प्रयत्नशील रहावं लागेल, असा आश्वासक सूर त्यांनी आळवला. 

इतिहासात जाऊ इच्छित नाही... 

इतिहासात जाऊ इच्छित नाही... ही एक नवी सुरुवात आहे असं म्हणताना त्यांनी 'त्या' अडीच वर्षांवरही कटाक्ष टाकला. 'सुरुवातीच्या अडीच वर्षआंमध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीमध्ये अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही आणि त्या संघर्षामुळेच 2022 मध्ये पुन्हा आपलं सरकार आलं आणि आज महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. हा एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला आणि तो अभूतपूर्व आहे', असं फडणवीस म्हणाले. 

तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे आणि पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना महायुतीच्या सरकारमध्ये एकदिलानं सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे, असा आग्रही सूर त्यांनी आळवला.