राष्ट्रवादीतील फूटीनंतरही घडलं नाही ते उद्या घडणार! अजित पवारांची घोषणा; म्हणाले, 'सकाळी 6.30 पासून...'

Maharashtra Assembly Election: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांविरुद्ध शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यातच आता दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत असताना ही बातमी समोर येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 1, 2024, 12:57 PM IST
राष्ट्रवादीतील फूटीनंतरही घडलं नाही ते उद्या घडणार! अजित पवारांची घोषणा; म्हणाले, 'सकाळी 6.30 पासून...' title=
अजित पवारांनी केली घोषणा

Maharashtra Assembly Election: दिवाळी म्हटल्यानंतर बारामतीकरांमध्ये चर्चा असते ते पवार कुटुंबाच्या पाडव्याची! दरवर्षी कितीही मतभेद असले तरी पवार कुटुंब या एका दिवशी आवर्जून एकत्र येतं आणि दिवाळी पाडवा अगदी उत्साहात साजरा करतं. या दिवशी शरद पवार हे समर्थकांनाही प्रत्यक्षात भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली फूट पडल्यानंतरही अजित पवारांनी कुटुंबारोबरच दिवाळी साजरी केली होती. त्यावेळेस याची जोरदार दर्चा झाली होती. मात्र यंदा मागील अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा खंडित होणार आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनीच दिली आहे.

पक्ष फुटल्यानंतरही जे घडलं नाही ते यंदा घडणार

अजित पवारांनी आपण स्वतंत्ररित्या पाडवा साजरा करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच बारामतीत यंदा दोन्ही पवारांचा पाडवा वेगळा होणार आहे. नेहमी गोविंद बागेमध्ये शरद पवारांचा पाडवा होत असतो. त्या ठिकाणी राज्यभरातील कार्यकर्ते शरद पवार यांना भेटायला येतात. पाडव्याला सर्व पवार कुटुंब एकत्र असतं यंदा मात्र अजित पवार आपला पाडवा स्वतंत्र करणार आहेत. अजित पवार आपला पाडवा बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील निवासस्थानी साजरा करणार आहेत आणि त्या ठिकाणी ते राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.स्वतः अजित पवारांनी या संदर्भातील माहिती दिल्याने राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही जे घडलं नाही ते यंदा घडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अजित पवारांनी दिलं आमंत्रण

अजित पवारांनी सोशल मीडियावरुन तशी पोस्टही केली आहे. पहाटे साडेसहा वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. "बारामतीकरांनो, सालाबादाप्रमाणे यंदाचा हा दिवाळी सण एकत्र येऊन आपण सगळे साजरा करूया," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच "दीपावली पाडवानिमित्त काटेवाडी येथील माझ्या निवासस्थानी मी तुमचं स्वागतो करतो," असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

आज अजित पवार दिवसभरात देणार 59 गावांना भेटी

दिवाळी सणानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत आहे. अजित पवार हे देखील बारामतीत आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी जवळपास 59 गावांमध्ये गाव भेट दौरा ठेवला आहे. प्रत्येक गावाला पंधरा मिनिटे असा त्यांचा शेड्यूल आहे. विधानसभा निवडणूक लागल्याने त्यांनी हा भेटीचा दौरा आयोजित केला आहे. ते प्रत्येक गावात जाऊन तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधत चर्चा करणार आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी मालाड गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.

नक्की वाचा >> 'उमेदवारी मागे घ्या, तुम्हाला...'; सरवणकरांनी नाकारली CM शिंदेंची 'ती' ऑफर? 'वर्षा'वर घडलं काय?

या ठिकाणी पत्रकारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मानखुर्द शिवाजी नगर येथील उमेदवार नवाब मलिक यांच्याबद्दल विचारले असता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "कोणता उमेदवार कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार हे 4 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होईल."