'फडणवीसांनी फिदीफिदी हसण्यापेक्षा उठून सदाभाऊ खोतांच्या कानफाडात...'; राऊतांचा संताप

Sadabhau Khot On Sharad Pawar Sanjay Raut Reacts: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सदा भाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे. यावेळेस राऊत यांनी मंचावर उपस्थित असलेल्या फडणवीसांवरही निशाणा साधला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2024, 01:18 PM IST
'फडणवीसांनी फिदीफिदी हसण्यापेक्षा उठून सदाभाऊ खोतांच्या कानफाडात...'; राऊतांचा संताप title=
पत्रकारांशी बोलताना साधला निशाणा

Sadabhau Khot On Sharad Pawar Sanjay Raut Reacts: रयत शेतकरी संस्थेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानाखाली मारायला हवी होती, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर पातळी सोडून केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये खोत यांच्याबरोबरच फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. 

खोत यांचं वादग्रस्त विधान काय होतं?

सांगलीमधील जत येथे आयोजित महायुतीच्या सभेत बोलताना सदा भाऊ खोत यांनी शरद पवारांवर खालच्या शब्दांमध्ये टीका केली. “अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, अशी टीका त्यांनी केली.

राऊत म्हणाले, मोदी पवारांकडून शिकलेत

खोत यांच्या टीकेसंदर्भात पत्रकारांनी राऊतांना विचारलं असता त्यांनी, "या माणसानं स्वत:चा चेहरा पहावा. आपण समाजकार्यात, राजकारणात काय केलं ते पहावं. मला कोणाशी व्यक्तिगत काही बोलायचं नाही. शरद पवार हे देशातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत. या सदा खोतच्या बापाने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार हे आपले कसे राजकीय गुरु आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा देश कसा फायदा घेतोय याबद्दल बारामतीत जाऊन सांगितलं आहे. पवारांचं बोट पकडून आम्ही कसं राजकारण केलं हे सुद्धा मोदींनी सांगितलं," असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> 'नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी...', राज ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कितीवेळ बाहेर...'

पवारांनी काही केलं नाही अशी ही जी टमरेळं म्हणत आहेत त्यांनी...

राऊत यांनी पुढे बोलताना भाजपा सरकारनेच शरद पवारांना दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिल्याची आठवण करुन दिली. "याच भाजपा सरकारनं शरद पवारांना देशातला दुसरा सर्वोच्च नागरी किताब पद्मविभूषण दिला आहे. सामाजिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्रातील कामासाठी हा किताब देण्यात आला आहे. पवारांनी काही केलं नाही अशी ही जी टमरेळं म्हणत आहेत त्यांनी मागील 60 ते 70 वर्षातील कामाचा लेखा जोखा पाहिला पाहिजे. आपण या राज्यासाठी काय योगदान दिलं याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांच्याबरोबरीने. पवारांसारखा नेता देशाच्या राजकारणातले भिष्मपितामाह आहेत. तुम्ही पवारांच्या आजारपणावर अशाप्रकारचं वक्तव्य करुन महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात उभी केली आहे," असा घणाघात राऊतांनी केला.

नक्की वाचा >> Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'

फडणवीस फिदीफिदी हसतात?

"राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, विलासराव देशमुख, वसंतराव नाईक यासारख्या नेत्यांची परंपरा आहे. या वृंदावनामध्ये ही भांगेची रोपटी फडणवीसांनी लावली आहे. महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरु आहे. कधी तो पडळकर कधी हे खोत गृहस्थ. तुमचं योगदान काय राज्यामध्ये? मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी? टीका करायला काही हरकत नाही लोकशाहीमध्ये. हे कोणत्या नशेत असतात? देवेंद्र फडणवीस फिदीफिदी हसतात? महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच," असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला.

नक्की वाचा >> 'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

आम्हाला लाज वाटते आमच्या पाठिंब्यावर...

"फडणवीसांना महाराष्ट्र नाकारतोय वारंवार, त्यांचा तिरस्कार करतो तो याच कारणासाठी! हा माणूस महाराष्ट्राचा नाही तर राज्याचा शत्रू आहे. हे महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य संयमी आहे. हे राज्य संतांचं राज्य आहे. हे चांगल्या राजकारणांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीसांच्या टोळीने हे राज्य खतम केलं आहे म्हणून आम्हाला राज्यातली सत्ता बदलायची आहे. तुम्ही ऐका ते भाषण तुम्हाला किळस येईल. देवेंद्र फडणवीसांनी उठून त्या सदाभाऊ खोतच्या कानफाडात मारायला हवी होती. तो फिदीफिदी हसतोय, टाळ्या वाजवतोय देवेंद्र फडणवीस. लाज वाटली पाहिजे. आम्हाला लाज वाटते तुम्ही कधी काळी आमच्या पाठिंब्यावर या राज्याचे मुख्यमंत्री होता," असंही राऊत म्हणाले.