Maharashtra Breaking News LIVE Updates: एसटी महामंडळाच्या ताफ्यातील साठ टक्के एसटी बस भंगार, परिवहन मंत्र्यांची माहिती

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यासहीत देश आणि परदेशातील प्रमुख घडामोडींचा धावता आढावा जाणून घ्या एकाच ठिकाणी...

Feb 19, 2025, 21:22 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: एसटी महामंडळाच्या ताफ्यातील साठ टक्के एसटी बस भंगार, परिवहन मंत्र्यांची माहिती

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रसहीत देशभरामध्ये आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. याबरोबरच राजकीय, प्रशासकीय घडामोडींसंदर्भातील सर्वच अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी....

19 Feb 2025, 21:19 वाजता

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील साठ टक्के एसटी बस भंगार, परिवहन मंत्र्यांची माहिती 

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील साठ टक्के एसटी बस भंगार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. भाडेवाढ केल्यामुळे एसटीचा तोटा कमी झाला, एसटी सुरळीत व्हायला दोन ते तीन वर्षे लागतील, असे ते म्हणाले. पाच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नव्हती खासदार संजय राऊत यांच्या म्हणण्याला काही एक अर्थ नाही, असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी खासदार संजय राऊत यांचा दावा फेटाळला.

19 Feb 2025, 20:45 वाजता

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. यावेळी महामार्गाच्या झालेल्या कामाची माहिती घेणार असून उर्वरित कामाचा आढावा घेणार आहेत. पळस्पे ते हातखंबा दरम्यानच्या कामाची ते पाहणी करतील. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेलेच आहे. 

19 Feb 2025, 20:01 वाजता

ठाकरेंच्या शिवसेना आमदार-खासदारांच्या होणाऱ्या बैठका पुढे ढकलल्या

ठाकरेंच्या शिवसेना आमदार-खासदारांच्या होणाऱ्या बैठका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ठाकरेंच्या आमदारांची बैठक आता 28 फेब्रुवारीला होणार तर खासदारांची बैठक 1 मार्चला होणार आहे. पक्षाचे डॅमेज कंट्रोल, राज्यातील ठिकाणची परिस्थिती आणि प्रश्न,विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पक्षाची पुढील रणनीती यासंदर्भात उद्धव ठाकरे आमदार खासदारांची बैठक घेणार आहेत.

19 Feb 2025, 17:33 वाजता

छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे मुंडके छाटा - कालीचरण महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे, त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडके छाटा असे विधान  कालीचरण महाराजांनी केलंय.त्याच मुंडक्याची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला असे ते म्हणाले. छावा चित्रपट टॅक्स फ्री झाला पाहिजे, नाही झाला तरी सर्व हिंदूंनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. 

19 Feb 2025, 16:09 वाजता

धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाही, अंजली दमानियांचा आरोप 

धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. मी भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे दिले आहेत. लाभाच्या पदाचा मुद्दा मी मांडल्याचेही त्या म्हणाल्या.

19 Feb 2025, 15:16 वाजता

शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने 10 जण जखमी 

पुण्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने 10 जण जखमी झाले आहेत. 10 पैकी 7 लोक वैद्यकीय कर्मचारी आणि वन अधिकारी कर्तव्यावर तैनात आहेत तर 3 बाहेरचे आहेत. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

19 Feb 2025, 14:34 वाजता

छावा सिनेमा विद्यार्थ्यांना 50% सवलतीने प्रदर्शित करण्याची मागणी 

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या जीवनावर आधारीत “छावा” हा सिनेमा शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 50% सवलतीने प्रदर्शित करण्याची मागणी शिवसेना आमदार किरण सामंत यांनी केली आहे.

19 Feb 2025, 13:26 वाजता

'मी माझे भाग्य समजतो की...'; शिवजयंतीनिमित्त रायगडावरुन विकी कौशलचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य मोहिमेला आज किल्ले रायगड वरून सुरुवात झाली. शिवजयंती चे औचित्य साधून झालेल्या या कार्यक्रमास छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल उपस्थित होते. अभिनेते विकी कौशल आणि संभाजी चित्रपटाचे निर्माते लक्ष्मण उतेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. विकी कौशल यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवजयंतीच्या दिवशी किल्ले रायगडावर यायची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.  छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.संभाजी महाराजांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या त्या तुलनेत भूमिका साकारताना माझी मेहनत शून्य असल्याचं कौशल यांनी नम्रपणे नमूद केलं.

19 Feb 2025, 12:51 वाजता

मोदींनी छत्रपतींचे तेज ओळखलं म्हणून...; केसरकरांचं विधान

"आज आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. नरेंद्र मोदी यांनी छत्रपतींचे तेज ओळखलं म्हणून मी त्यांचे आभार मानतो. नेव्हीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे. जो अपघात घडला तेव्हा राज्यात फार मोठं राजकारण करण्यात आलं मात्र अपघात हा अपघात असतो. त्याच ठिकाणी आत भव्यदिव्य आणि जिवंत असं स्मारक उभं राहणार आहे.  या जागेत शिवसृष्ठीची उभारणी करावी अशी मागणी मी पालकमंत्री यांना करतो," असं दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्घटनाग्रस्त पुतळ्याच्या जागी नवीन पुतळा उभारण्याच्या पायाभरणीच्या कामाला आजपासून सुरुवात झाली त्या कार्यक्रमात केसरकर बोलत होते.

19 Feb 2025, 11:47 वाजता

कोल्हापुरात शिवजयंती सोहळा

कोल्हापुरात देखील छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत छत्रपती घराण्याच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली . कोल्हापुरातील नर्सरी बाग इथं असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये शाही लावाजमासह आजचा जयंतीचा सोहळा संपन्न झाला सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी हा मुख्य सोहळा साजरा झाला. छत्रपती घराण्याचे मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा गाण्यात आला. यानंतर खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी शिवछत्रपतींची आरती केली. जन्मकाळ सोहळा संपन्न झाल्यानंतर शाहू महाराज छत्रपती यांनी शिवजन्म पोवाडा ऐकला.