कोल्हापूर : राजस्थान पोलिसांना डोकेदुखी ठरलेल्या श्याम पुनिया ही कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीला कोल्हापुरी पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. या टोळीशी दोन हात करत कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या सर्वांना जेरबंद केलंय. हे गँगस्टर राजस्थानमधून कर्नाटकच्या धारवाडमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झाले. राजस्थानपाठोपाठ या टोळीनं कर्नाटक पोलिसांना चकवा दिला. तिथून ते थेट कोल्हापूरच्या हद्दीत घुसले. कोल्हापूर पोलिसांना याची माहिती मिळाली. ही टोळी पुण्याच्या दिशेनं जात असताना पुणे-बंगलोर महामार्गावरील किणी टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा लावला.
रात्री नऊ वाजता मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीतून हे कुख्यात गॅंगस्टर किणी टोलनाक्याजवळ पोहोचले. त्यावेळेला कोल्हापूर पोलिसांनी गॅंगस्टरना चारही बाजूंनी घेरलं. गॅंगस्टरचा म्होरक्या श्याम लाला याने कोल्हापूर पोलिसांवर फायरिंग केली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. यात श्याम पूनिया आणि त्याचे साथीदार गंभीर जखमी झाले. कोल्हापूर पोलिसांनी कोणतीही परवा न करता थेट गॅंगस्टरच्या गाडीवर झडप घालून त्यांना जेरबंद केलं.. जवळपास 15 ते 20 मिनिटे हा थरार सुरू होता.
पहिला आरोपी शामलाल गोवरधन वैष्णोई हा 22 वर्षांचा असून राजस्थानच्या जोधपूर- बीयासरमध्ये राहणारा आहे. दुसरा आरोपी सरवनकुमार मनोहरलाल मान्जु वैष्णोई हा 24 वर्षांचा असून विष्णुनगर, जोधपुरचा आहे.तर तिसरा आरोपी श्रीराम पांचाराम वैष्णोई हा 23 वर्षांचा असून बटेलाई जोधपुरमधला आहे.
कुख्यात गॅंगस्टर श्याम पूनिया आणि साथीदारांवर राजस्थानमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. A K 47 सारखं शस्त्र हे गॅंगस्टर स्वतः जवळ बाळगत होते. इतकंच नव्हे तर लहान मुलांनाही शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण या गॅंगस्टर मार्फत प्रशिक्षण दिलं जात होतं.
त्यामुळे राजस्थान पोलिसांची डोकेदुखी बनली होती. या गॅंगस्टर ने सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी शस्त्र हातात घेऊन काही गाणी देखील तयार केली आहेत.