वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : परीक्षेला जाणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला धडक दिल्याने एकाला जीव गमवावा लागण्याची घटना जळगावात (Jalgaon Accident) घडलीय. आयशर ट्रकने तरुणांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा गंभीर अपघात झाला आहे. ट्रकच्या धडकेनंतर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या खाली येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तरुणाचे शीर धडापासून वेगळे झाले. प्रशांत भागवत तायडे (Prashant Bhagwat Tayede) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास जळगाव शहरातील खोटे (Jalgaon Crime) नगराजवळील वाटीकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावर हा दुर्दैवी अपघात झालाय.
परीक्षेला जात असतानाच अपघात
रावेर तालुक्यातील गहूखेडा गावातील प्रशांत आणि जयेश रहिवाशी आहेत. धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथील आबासाहेब शिवाजीराव सिताराम पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक महाविद्यालयात दोघेही मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत होते. महाविद्यालयात गेल्या तीन दिवसांपासून डिप्लोमाच्या परीक्षांच्या परीक्षा सुरु आहेत. शुक्रवारी प्रशांत आणि जयेश तिसरा पेपर देण्यासाठी सकाळी गहुखेडा गावातून दुचाकीवरुन निघाले होते. मात्र भरधाव आयशरने दुचाकीला मागून धडक दिल्याने गंभीर अपघात झाला.
हेल्मेट घातलेले शीर झाले धडावेगळे
या धडकेनंतर प्रशांत आणि जयेश दोघेही दुचाकीवरुन खाली पडले. मात्र प्रशांत समोरुन येणाऱ्या खडीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या खाली आला. यावेळी ट्रॅक्टरचे पुढचे चाक प्रशांतच्या डोक्यावरुन गेले. यात प्रशांतचे डोके हेल्मेटसह धडापासून वेगळे होऊन बाजूला पडले. तर जयेश गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जयेशला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कायमस्वरुपी नोकरी मिळवण्यासाठी डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला आणि...
प्रशांत भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे महावितरण कंपनीत नोकरीला होता. कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून प्रशांतने उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याने डिप्लोमाला प्रवेश घेतला होता. मात्र परीक्षेला जात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला. प्रशांतच्या मागे त्याचे आई- वडील आणि एक विवाहित बहिण आहे. त्यामुळे तायडे कुटुंबाचा आधार हिरावल्याने प्रशांतच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
पतीला रुग्णालयात पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू
दरम्यान, जळगावमध्ये आणखी एका भीषण अपघातात पतीला रुग्णालयात पाहायला जाणाऱ्या एका महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला. कुसंबा येथे भरधाव रुग्णवाहिकेने महिलेला जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आजारी असलेल्या पतीला पाहण्यासाठी ही महिला रुग्णालयात जात होती. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला.